Friday, April 26, 2024
Homeनाशिकमेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत

मेशी अपघात : रिक्षातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत

मालेगाव | वार्ताहर

देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ बस व रिक्षा यांच्यात मंगळवारी झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी आहे. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

बसमधील मृतांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार दहा लाख रुपये देय आहेत. परिवहन महामंडळातर्फेरिक्षातील मृतांना विशेष बाब म्हणून दोन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी आज मालेगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी एसटी बस व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 26 जण ठार झाले, तर 35 जण जखमी झाले.

जखमींपैकी दोन महिला व दोन पुरुषांवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री श्री. परब, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे आज मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेवून जखमींच्या प्रकृतीबाबत विचारपूस करीत औषधोपचारांची माहिती घेतली.

त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. परिवहन मंत्री श्री. परब यांनी सांगितले, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात चार जखमी असून खाजगी रुग्णालयात 3 जखमी दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री महोदयांनी घेतली असून ते परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे बसमधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत कालच जाहीर करण्यात आलेली आहे. रिक्षातील मृतांच्या वारसांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील. तसेच जखमींचा रुग्णालयाचा खर्च परिवहन महामंडळातर्फे करण्यात येईल.

याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत जे मृत पात्र ठरतील, त्यांच्याही वारसांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी महसूल व कृषी विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. एसटी बस अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

तसेच अपघाताच्या तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांवरही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, बस व रिक्षा यांच्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या अपघाताचा प्रारंभिक अहवाल प्राप्त झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.के. एस. डांगे, डॉ. शिलवंत आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या