सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
स्थानिक बातम्या

सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सटाणा | तालुका प्रतिनिधी 

सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या रावळगाव फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (दि. १६) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ललित अरविंद सोनवणे (वय २६, रा. सटाणा) व अतुल रमेश सोनवणे (वय २३, रा. ब्राह्मणगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. घरातील तरुण मुलं अपघातात मृत्यू पावल्याने सटाणा शहरासह ब्राह्मणगाव गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी अशी की, काल (दि. १६) ललित हा लक्ष्मण वाडी येथील शेतातील कामे आटोपून घराकडे निघाला होता. शेतापासून एक किलोमीटर पुढे आल्यानंतर समोरून मालेगावकडे जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दोन्हीही  दुचाकींचा वेग अधिक असल्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेत दुसऱ्या दुचाकीवरील तरुण अतुल सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. तर ललित गंभीर जखमी असल्यामुळे त्याला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री त्याचाही रुग्णालयात मृत्यू झाला.

अतुल हा शहरातील एका नामांकित कंपनीत कामाला होता. ड्युटी संपल्यानंतर घरी परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. तर ललित हा हुरहुन्नरी आणि मनमिळावू स्वभाव असल्याने शहरात त्याचा लौकिक होता. नेहमीच समाजकार्यात अग्रस्थानी असलेल्या ललितच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही करत्या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सटाणा शहरासह ब्राह्मणगाव गावावर शोककळा पसरली आहे. आज शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत ललित याच्या पश्च्यात आजोबा, आई-वडील, भाऊ  असा परिवार आहे. तर अतुलच्या परिवाराची माहिती मिळू शकली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com