Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकविजेच्या तीव्र धक्क्याने दोघांचा मृत्यू; एक थोडक्यात बचावला; बस अपघातानंतर मेशीत पुन्हा...

विजेच्या तीव्र धक्क्याने दोघांचा मृत्यू; एक थोडक्यात बचावला; बस अपघातानंतर मेशीत पुन्हा दुर्दैवी घटना

वासोळ / मेशी | वार्ताहर

कांद्याला पाणी देण्यासाठी विहिरीवरील वीजपंप (इलेक्ट्रॉनिक मोटार) सुरू असताना विजेचा धक्का बसल्याने देवळा तालुक्यातील मेशी येथील दोघा शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

संदीप नानाजी शिरसाठ (वय ३०) व भूषण उर्फ मनोज रमेश शिरसाठ (वय २२) असे या शेतकऱ्यांची नावे आहेत. तर कृष्णा उत्तम शिरसाठ (वय 42) हे थोडक्यात बचावले आहेत.

मेशी येथील बस अपघाताच्या घटनेला अवघा एक आठवडा उलटला असताना ही दुसरी दुर्घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी की, संदीप शिरसाठ हा शेतकरी कांद्याला पाणी देण्यासाठी विहिरीवर इलेक्ट्रॉनिक मोटर (वीजपंप) सुरू करण्यासाठी गेला होता. मोटरच्या पेटीला वीजप्रवाह उतरला असल्याने संदीपला विजेचा धक्का बसला. संदीप पेटी पासून सुटका करत असल्याचे पाहून शेजारी शेतात काम करत असलेल्या भूषणने बघितले.

त्यानंतर भूषण संदीपच्या मदतीला धावला. संदीप जवळ जाऊन त्याला ओढण्याचा प्रयत्न करताचं भूषणलाही विजेचा जोरदार धक्का बसला.

दोघीही जायबंदी झाल्याचे पाहताच संदीपच्या आई शोभाबाई शेजारील कृष्णाजी यांना बोलविण्यासाठी गेल्या. त्यानंतर कृष्णाजी मदतीला धावून आले असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते दूरवर फेकले गेले. त्यामुळे कृष्णाजी या घटनेतून बालंबाल बचावले.

यावेळी शोभाबाई यांनी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकऱ्यांनी विद्युत रोहित्राकडे धाव घेऊन वीजप्रवाह बंद केला. मेशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यवस्थ स्थितीत तिघांनाही उपचारासाठी दाखल केले. परंतु संदीप व भूषणची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

देवळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले व कृष्णाजी यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. कृष्णाजी यांची स्थिती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या