मालेगावी आज पुन्हा दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर; प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १८ वर
स्थानिक बातम्या

मालेगावी आज पुन्हा दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर; प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १८ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज पुन्हा एका महिलेचा आणि पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. येथील सामन्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेचा आज मृत्यू झाला. या महिलेचे वय ६४ वर्ष होते.   येथील जीवन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघांच्या मृत्युनंतर मालेगावमधील मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.

सामान्य रुग्णालयात मृत्यू पावलेली महिला शहरातील कुंभारवाडा भागात रहात होती. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या महिलेचा तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित अहवाल बाधित आला होता. संपूर्ण मृतदेहाचे निर्जंतुकीकरण पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.

दुसरी घटना ५५ वर्षीय एका व्यक्तीचा आज दुपारी जीवन रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाचाही कोरोना बाधित अहवाल सिद्ध झाला होता. ही व्यक्ती शहरातील मुस्लीमनगर भागातील रहिवाशी असल्याचे समजते.

एकट्या मालेगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५ वर पोहोचली असतानाच आता मृतांचा एकदा हळहळू वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१८ प्रतिबंधित असलेले क्षेत्रांममध्ये आरोग्य यंत्रणा पोहोचून रुग्णांची तपासणी करत आहेत. या परिसरात सशस्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा परिसर निर्जंतुक केला जात असून संशयित रुग्ण तपासणीला वेग देण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात चौदा दिवस नागरिकांना घरातच थांबावे लागणार आहे. तरच कोरोनाचा उद्रेक रोखता येणे शक्य होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुणासही याभागातून ये-जा करता येणार नाही. याबाबतच्या सूचना आज ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त किशोर बोर्डे व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

अटकाव क्षेत्र दहा ने वाढले

सुरुवातील मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. हा परिसर पूर्णपणे सील केला असतानाही आता या क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अटकाव म्हणजे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ८ वरून १८ वर पोहोचली आहे. यामध्ये
शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधी नगर, जाधव नगर, मोमीन पुरा, दातार नगर, जुना आझाद नगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे.यामुळे प्रशासकी यंत्रणेच्या सोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com