शेततळ्यात बुडून दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; मालेगाव तालुक्यातील काटवन शिवारातील घटना

शेततळ्यात बुडून दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; मालेगाव तालुक्यातील काटवन शिवारातील घटना

मालेगाव | प्रतिनिधी 

शेततळ्यातून करपू लागलेल्या पिकांना पाणी देत असताना दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. दिवसा विजेचे भारनियमन असल्यामुळे दोघे भाऊ हवेचा दाब निर्माण करून शेततळयातून पाणी काढून पिकांना देत होते. यादरम्यान ही घटना घडली. ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (वय २७) व किशोर मुरलीधर सोनवणे (वय ३०) असे दोघा भावंडांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, मयत ज्ञानेश्वर व किशोर यांची तालुक्यातील रामपुरा भागात शेती आहे. शेतीत मका आणि उन्हाळ कांद्याची  लागवड केली आहे. तालुक्यातील तपमानाचा पारा वाढल्यामुळे पिकांना पाणी दिल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शेततळे तयार करून पाण्याची साठवणूक करून ठेवली आहे.

वाढलेल्या तपमानात एकीकडे विहिरींनी तळ गाठला आहे. तर भारनियमन दिवसाच असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवस रात्र एक करून शेततळयातून पाणी पिकांना द्यावे लागत आहे.

तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेले पिक वाचविण्याचे मोठे आव्हान येथील शेतकऱ्यांपुढे आहे. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास  प्राथमिक शिक्षक असलेला किशोर सोनवणे हा आपल्या ज्ञानेश्वर या भावासोबत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते.

भारनियमन असल्यामुळे हवेच्या दाबाने पाणी देण्यासाठी मदत दोघेही प्रयत्न करत होते. अशातच ज्ञानेश्वरचा पाय घसरला आणि तो थेट २५-३० फुट खोल असलेल्या शेततळयात बुडाला.

किशोरने बघताच एका खांबाला नळीचा वेढा घालून त्याने शेततळयात भावाला वाचविण्यासाठी उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने नळीचा वेढा निघून गेल्याने किशोरही पाण्यात बुडाला. दोघांनाही पोहोता येत नसल्याने ते एकमेकांची मदत करू शकले नाही. या घटनेत दोघाही भावंडांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती वडनेर खाकुर्डी पोलिसांना देण्यात आली. पोलीस यंत्रणा दाखल झाल्यानंतर दोघा भावंडांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मालेगावी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी वडनेर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com