सुरगाण्यात २९ लाखांचा धान्य अपहार ; दोघे अटकेत, गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

सुरगाण्यात २९ लाखांचा धान्य अपहार ; दोघे अटकेत, गुन्हा दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

बार्‍हे | वार्ताहर 

आदिवासी विकास महामंडळाच्या बाऱ्हे ( ता.सुरगाणा ) येथील बायफच्या मालकीच्या गोदामातून शासकीय धान्याची परस्पर विक्री करणाऱ्या गोदामपालासह धान्य विकत घेणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यालाही बाऱ्हे पोलिसांनी अटक केली आहे.

दोघांच्या विरोधात बाऱ्हे ( ता.सुरगाणा ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी ( दि. २६ ) आदिवासी विकास महामंडळाच्या बाऱ्हे गोदामात हा प्रकार उघडीस आला आहे. संशयितांनी तब्बल २९ लाखांच्या धान्याचा उपहार केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

बाऱ्हे पोलिसांनी दिलेली माहिती व आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी तुषार मोरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, बाऱ्हे येथे आदिवासी विकास महामंडळाच्या या गोदामात विवेक नावस्कर नावाचा गोदामपाल म्हणून कार्यरत आहे.

दोन दिवसांपूर्वी बाऱ्हे गोदामात संशयिताने स्थानिक धान्य व्यापारी दत्तात्रय पवार ( रा.बाऱ्हे ) यास या गोदामातून परस्पर धान्य देत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या होत्या. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गोदामामधील धान्याची तपासणी केली असता तब्बल २९ लाखांचे धान्य कमी भरले याबाबत गोदामपालास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांनी धान्याचा अपहार केल्याची कबुली दिली. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे तपास करत आहेत.

मोठा अपहार उघडीस येण्याची शक्यता

आदिवासी विकास महामंडळ आदिवासी शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेते. ते धान्य विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा, निवासी शाळांना पुरविले जाते. बाऱ्हे येथील गोदामात हा पुरवठा केला जातो. येथून हे धान्य जिल्ह्यातील शाळांना पुरविले जाते. गोदामपालावर धान्य वितरणाची जबाबदारी असते. मात्र, येथे कुंपनच शेत खात असल्याने मोठा धान्य अपहार उघडीस येण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com