12 वी परिक्षेच्या सरावासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’; नाशिकच्या युवा सीएची निर्मिती

नाशिक । प्रतिनिधी

दहावी बारावीच्या परिक्षेची विद्यार्थी जोरदार तयारी करताना नजरेस पडत आहेत. अशातच नाशिकमधील चार्टड अकाऊटंट असलेल्या एका व्यक्तीने 12 वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरावासाठी मोफत अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

आयुष्याचा आणि करीयरचा टर्निंग पॉईंट मानल्या जाणार्‍या बारावी परिक्षा काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. बारावीचे वर्ष असल्याने अनेक विदयार्थ्यांनी वर्षभर कॉलेज व क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करून ठेवला आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसपासून वंचित राहावे लागते.

त्यामूळे अशा विद्यार्थ्यांना मोफत वाणिज्य विभागाच्या विषयांची रिव्हीजन करता यावी या उद्देशाने युवा चार्टड अकौंटंट ऋषिकेश एकबोटे यांनी टी टी कॉमर्स या नावाचे एक मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप पुर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या अभ्यासक्रम व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

या अ‍ॅप मध्ये विषयानुरूप लेक्चर, विविध सराव परीक्षा यांचा समावेश करण्यात आला आहे. विदयार्थी त्यास अमर्यादित वेळेकरिता बघू शकतात व परीक्षेचा सराव करू शकतात.

हे अ‍ॅप बनविणे माझ्या सामाजिक बांधीलकीचा एक भाग असून विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप पुर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिले आहे. गुगल प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येईल अशी माहिती ऋषीकेश यांनी देशदूतशी बोलताना दिली.