
मालेगाव | प्रतिनिधी
मालेगाव महापालिका आयुक्तपदी अमरावती येथील जिल्हा प्रशासन अधिकारी त्र्यंबक कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज नगरविकास विभागाकडून बोर्डे यांना आदेश प्राप्त झाले आहेत. यानुसार मालेगाव महानगरपालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची वैद्यकीय रजा मंजूर करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
किशोर बोर्डे यांच्या जागी कासार यांनी त्वरित मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घ्यावीत तसेच मालेगावमधील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
करोना विषाणूने मालेगावात कहर केले आहे. मालेगावमधील वाढलेली मृतांची आणि करोनाबाधित रुग्णांची संख्या यामुळे प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.
करोना परिस्थितीवर नियंत्रण न मिळविल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे समजते. आतापर्यंत मालेगावमध्ये दोन अधिकाऱ्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी एका अपर जिल्हाधिकारी पदावर असेल्या अधिकाऱ्याच्या जागी नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले आहे.
तसेच आज महापालिका आयुक्तांना वैद्यकीय रजा मंजूर करून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक याठिकाणी केल्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
अमरावती जिल्ह्यात जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून रुजू असलेले त्र्यंबक कासार यांना आज कार्यरत पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून. त्वरित त्यांनी मालेगाव महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन शासनाला अहवाल पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.