Video : इगतपुरी : मुंबईहून हजारोंच्या संख्येने नागरिक परतीच्या वाटेवर; मुंबई-आग्रा महामार्गावर कोंडी

Video : इगतपुरी : मुंबईहून हजारोंच्या संख्येने नागरिक परतीच्या वाटेवर; मुंबई-आग्रा महामार्गावर कोंडी

(व्हिडीओ/फोटो : प्रशांत निकाळे)

नाशिक / इगतपुरी

मुंबईहून नाशिककडे लोंढेच्या लोंढे आज सकाळपासून निघाले आहेत. दररोज येणाऱ्या उत्तर भारतीयांच्या गर्दीत आज मुंबईतील चारचाकी, रिक्षा यांचाही सहभाग वाढल्यामुळे घोटी, इगतपुरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असला तरीदेखील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गर्दीला अटकाव घालण्याचे अपयश आल्याचे प्रत्यक्षदर्शिकडून सांगितले जात आहे.

दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईहून नाशिकमार्गे उत्तर भारत गाठण्यासाठी निघाले आहेत. पायी, सायकल, मोटारसायकल, रिक्षा, चारचाकी असे मिळेल त्या वाहनाने नागरीक मुंबई सोडून नाशिककडे निघाले आहेत. दुसरीकडे, या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना सांगितले की, राज्यांतर्गत वाहतूक आणि राज्याबाहेरील वाहतुकीला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मजूर, कामगारांना घर गाठता यावे यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. असे असताना नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करत शेकडो किमीची पायपिट करत गाव गाठण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

यामध्ये दुचाकी, चारचाकी, रिक्षा यांचा समावेश अधिक आहे. अचानक वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे घोटी टोलनाक्यावर अचानक वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह महामार्ग पोलिसांनी मुंबई आग्रा हायवेवर दाखल होऊन कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अपुरे मनुष्यबळ नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर असल्यामुळे गर्दी रोखण्याच अपयश प्रत्यक्षदर्शिकडून सांगितले जात आहे.

आजच्या नागरिकांच्या गर्दीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांचीही भर पडल्याने अनेक वाहनांना गंतव्यस्थान गाठण्यास उशीर झालेला बघायला मिळत आहे. सध्या मुंबई आग्रा महामार्गावर घोटी, इगतपुरी पासून मुंबईच्या ठाण्यापर्यंत प्रचंड नागरिकांचे लोंढे दिसून येत आहे.

नाशिककरांनो सावधान

नाशिकमध्ये हजारो नागरिक मुंबईकडील भागातून शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन सोशल मीडियातून अनेकजन करत आहेत. नागरिकांना मदत जरुर करा पण यावेळी सामाजिक अंतर, मास्क वापरून मदत करावी असे आवाहनदेखील केले जात आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com