नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या १२ वर; आज सहा नव्या क्षेत्रांची भर

नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या १२ वर; आज सहा नव्या क्षेत्रांची भर

नाशिककरांची चिंता वाढली ; रुग्णांची संख्या 16

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडुन शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याने एप्रिल महिन्यात केवळ दहा असतांना आज (दि.2) सकाळी शहरातून पाठविलेल्या 43 प्राप्त अहवालात 12 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन यात शहरातील 6 जणांचा समावेश आहे. यामुळे आता शहरातील करोना रुग्णांची संख्या 16 झाली असुन यामुळे शहरात पहिलेच 6 प्रतिबंधीत क्षेत्र असतांना यात नव्याने 6 प्रतिबंधीत क्षेत्राची भर पडणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतांना नाशिक महापालिकेकडुन प्रभावी उपाय योजना राबविल्याने रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्याचे काम सुरु असतांना आज अचानक शहरातून ज्या 43 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असतांना यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन यात नाशिक शहरातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

यात एक डॉक्टर, फामॉसीस्ट, पोलीस व पत्रकार यांचा समावेश आहे. यामुळे आता शहरातील करोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे. नाशिक शहरातील नवीन सहा रुग्ण राहत असलेल्या भागात पाथर्डी फाटा भागात असलेल्या मालपाणी सेफ्रॉन (गृह प्रकल्प), सातपूर कॉलनी, दामोदरनगर हिरावाडी पंचवटी, सावतानगर नवीन नाशिक, जिल्हा रग्णालय नाशिक व उत्तमनगर नवीन नाशिक यांचा समावेश असुन या भागांना प्रतिबंधक भाग म्हणुन घोषीत करण्यात आले.

यापुर्वी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नवीन नाशिक विभागातील गोविंदनगर – मनोहरनगर, नवश्या गणपती परिसर आनंदवल्ली, धोंगडेनगर नाशिकरोड, बजरंगवाडी समाजकल्याण विभाग वसतीगृह, संजीवनगर सातपूर अंबड लिंकरोड व वृंदावननगर म्हसरुळ (कै. किशोर सुर्यंवंशी मार्ग) असे सहा भाग प्रतिबंधीत केले होते, आता यात सहाने भर पडणार असुन शहरात आता डझनभर भाग हे प्रतिबंधी क्षेत्र म्हणुन राहणार आहे.

नाशिक शहरातील नवे अटकाव क्षेत्रे

नाकाबंदीत नागरिक बाहेरुन येतात कसे ?

देशभरात तिसर्‍या टप्प्यातील लॉकडॉऊनचा कालावधी आता 17 मे पर्यत वाढविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आलेली असुन तालुक्यात सिमेंवर नाकाबंदी करुन वाहन तपासणी केली जात आहे. अशाप्रकारे कडक निर्बंध असतांनाही शहरात पुणे, धुळे, जळगांव व मालेगांव अशा भागात नाशिकमध्ये लोक येत असल्याचे आजच्या करोना बाधीतांवरुन समोर आले आहे. शहरातून पाठविण्यात आलेल्या 43 संशयितांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातील 12 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यातील केवळ सहा जणच शहरातील आहे. उर्वरित शहरात आलेच कसे ? नाकाबंदी – वाहनतपासणी कुचकामी ठरत तर नाही ना ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयच बनले हॉट स्पॉट…

जिल्हा रुग्णालयात 26 एप्रिलला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना करोना झाल्याचे समोर आले आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन पीपीई किट व इतर सरंक्षणाच्या सर्व बाबी वापरण्याचे काम वैद्यकिय अधिकारी, नर्सेस, पॅरामेडीकल स्टॉफ यांच्याकडुन केले जात आहे. असे असतांना आज एका वरिष्ठ, अनुभवी डॉक्टरांना करोना झाल्याचे समोर आले आहे.

यापुर्वी याठिकाणी काही कर्मचार्‍यांना संशयित म्हणुन अ‍ॅडमिट करण्यात आले होते. यामुळे आता जिल्हा रुग्णालय हॉट स्पॉट बनले कि काय अशी शंक व्यक्त केली जात आहे. अशाच प्रकारे डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयातील आरोग्य सेवकांना देखील संशयित म्हणुन दाखल करण्यात आले आहे. तसेच महापालिका वैद्यकिय विभागातील नवीन नाशिक मधील महापालिकेच्या रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणुन असलेल्या सेवकाला करोना झाला आहे. यामुळे आता वैद्यकिय व आरोग्य विभागाला पुढच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

अशी आहे नवीन रुग्णांची हिस्ट्री…

यातील सातपूर कॉलनीतील वृद्द महिला ही आपल्या कुटुंबासह मालेगावला एका दशक्रियेसाठी मालेगांव नुकतीच जाऊन आली होती. तर पंचवटीतील हिरावाडी भागातील दामोदरनगर मधील पोलीस कर्मचारी मालेगांव येथील बंदोबस्तावरुन परतला होता. तर नवीन नाशिक भागातील एका रुग्णांकडे पुण्याहून त्यांचा पुतण्या राहण्यासाठी काही दिवसापुर्वी आला होता. नवीन नाशिक भागात राहणारा फार्मासिस्ट हा महापालिकेच्या फिरत्या पथकासोबत कार्यरत होता. अशाप्रकारे शहरातील नवीन करोना रुग्णांची हिस्ट्री असुन यातून अनेक बाबींचा उलगडा होत आहे.

नाशिक आता रेड झोनमध्येच….

नाशिक जिल्ह्यातील मालेगांव मधील करोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना नाशिक शहरातील आकडा हा 10 पर्यत मर्यादीत असतांना आज यात सहाने भर पडून तो 16 झाला आहे. तर जिल्ह्यचा आकडा हा 316 पर्यत गेला आहे. 30 एप्रिलपर्यत नाशिकच्या रुग्णांचा आकडा 10 असल्याने शंभर कि. मी अंतरावर मालेगांव असल्याने नाशिक शहराला रेड झोन मधुन वगळा अशी विनंती राजकिय मंडळीकडुन शासनाला केली जात होती. मात्र पंधरा रुग्णांच्यावर असलेला भाग रेड झोनमध्येच राहणार या शासन अटीनुसार आता नाशिक शहरातील रुग्णांची वाढलेली संख्या पाहता आता नाशिक रेड झोनमध्येच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com