Sunday, May 5, 2024
Homeनाशिकदिलासादायी : मालेगावमध्ये तिघे रुग्ण झाले करोनामुक्त; इतर १२ रुग्ण करोनामुक्त होण्याच्या...

दिलासादायी : मालेगावमध्ये तिघे रुग्ण झाले करोनामुक्त; इतर १२ रुग्ण करोनामुक्त होण्याच्या मार्गावर

मालेगाव | प्रतिनिधी 

करोना रुग्णांची शंभरी पार केलेल्या मालेगावमधून अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आज प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार तीन करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर इतर तब्बल १२ रुग्ण हे करोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मालेगावमध्ये अक्षरश: करोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत मालेगावमध्ये १२७ करोनाबाधित रुग्ण असून जवळपास १२ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, तिघेही रुग्ण मन्सुरा रुग्णालयातील आहेत. त्यांनी वेळेत उपचारासाठी दाखल झाल्यामुळेच त्यांचा करोनापासून मुक्त होता आले अशी भावना व्यक्त केली जात आहे. आज या तीनही रुग्णांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देत आज घरी सोडण्यात आले.

याप्रसंगी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासन तथा इन्सिडंट कमांडर नितीन कापडणीस, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशीलकुमार शिंदे, डॉ. अरुण पवार , माजी आमदार तथा माजी महापौर रशीद शेख, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी व समाज माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

आज मालेगाव शहरातील १० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकही रुग्ण बाधित आढळून आला नसून तीन रुग्ण करोनामुक्त तर इतर १२ रुग्ण करोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आज करोनामुक्त झालेले रुग्ण ७ एप्रिलला घशाचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर ९ एप्रिल रोजी हे अहवाल बाधित आढळून आले होते. या रुग्णांवर तातडीने उपचार करून जवळपास १४ दिवसानंतर म्हणजेच २१ एप्रिलरोजी त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. ते यावेळी निगेटिव्ह आले होते.

यानंतर पुढच्या २४ तासांनी पुन्हा नमुने घेऊन तपासणीला पाठविण्यात आले होते. तेव्हाही हे नमुने निगेटिव्ह आले होते. यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामधील एका महिला रुग्णाने सामान्य रुग्णालयातील डॉ. हितेश महाले यांचे आभार मानत त्यांना परमेश्वर सुखी ठेवो त्यांनी आम्हाला खूप चांगले उपचार दिले अशी भावना व्यक्त केली.

चांदवड येथील 27 वर्षीय रुग्ण कोरोनामुक्त झालेल्या तरूनानेदेखील मालेगाव प्रशासन व वैद्यकीय चमूने घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून जीवन व मंसूरा येथे दोन्ही ठिकाणी चांगली वैद्यकीय सेवा मिळाल्याबाबत आभार व्यक्त केले.

मालेगाव मनपा प्रशासन आरोग्य यंत्रणा सक्षम असून रुग्णालयातील डॉक्टरांची टिम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकर बरे होतील, असा विश्वास कृषी मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

आज मालेगाव मधील तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. एकाचवेळी तीन रूग्ण बरे झाल्याने वेळेत आरोग्य विभागाशी संपर्क केला असता रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा समर्थ आहे, हेच यातून दिसून येतेय. जनतेने आजपर्यंत सर्व प्रशासनाला साथ दिली आहे. आतापर्यंत जवळपास 12 रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. यापुढेही जनतेने साथ दिल्यास, लवकरच नाशिक जिल्हा आपण करोनामुक्त करू असा मला विश्वास वाटतो 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

सर्व प्रशासन अहोरात्र या कठीण समयी सेवा देऊन मेहनत घेत आहे, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, सर्व यंत्रणेच्या जबाबदारी पूर्ण कार्यामुळेच आज आपल्याला निकाल दिसत आहे, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करा, सूचनांचे पालन करा, आपण लवकरच या बिकट परिस्थिती मधून बाहेर पडू, यावेळचा रमजान घरीच साजरा करा पुढच्या वर्षी आपण रमजान मोठ्या धूमधडाक्यात साजरा करू असे महापौर तहेरा शेख म्हणाल्या.

ज्या आजारावर चांगल्या देशांनी हात टेकले, त्याला आपण पराभूत करत आहोत, जर नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सूचना पाळल्या आपली काळजी घेतली, अफवांना बळी न पडल्यास लवकरच आपण हे युद्ध जिंकून मालेगाव शहर कोरोनामुक्त करू अशी भावना माजी महापौर रशीद शेख यांनी व्यक्त केली.

आज  मालेगावमधील रुग्ण करोनामुक्त झाले असले तरीदेखील हुरळून न जाता मोठ्या संख्येने दाखल रुग्णांमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण याच प्रमाणे कसोटीने संपुर्ण जबाबदारी पार पाडल्यास शहरातून करोनाला हद्दपार करण्यात प्रशासन व नागरिकांना नक्की यश मिळेल असे मत घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया व महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासन तथा इन्सिडंट कमांडर नितीन कापडणीस,यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या