सटाणा शहरात तीन किमी परिसर सील; प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही ये-जा करू शकत नाही

सटाणा शहरात तीन किमी परिसर सील; प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही ये-जा करू शकत नाही

नाशिक | प्रतिनिधी 

सटाणा शहरातील भाक्षी रोड परिसरातील एक नागरिक करोना बाधित आढळून आला आहे. यानंतर शहरातील हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून तीन किमीपर्यंत सीमा सील करण्यात आल्या आहेत. तर पाच किमी पर्यंतचा परिसर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात कोन्हीही ये-जा करू शकत नाही. याबाबतच्या सूचना उपविभागीय दंडाधिकारी विजयकुमार भांगरे यांनी आज दिल्या आहेत.

ते म्हणाले, संपूर्ण परिसरातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तपासणी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेमून दिलेल्या आरोग्य सेवकांच्या मदतीने ५०-५० घरातील नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.

दुसरीकडे अत्यावश्यक सेवादेखील या परिसरात बंद असणार आहेत. याठिकाणी किरणा, भाजीपाला, दुध, मेडिकल यांची आवश्यकता असल्यास नगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

परिसरातील सर्व घरांचे सर्व्हेक्षण होणार आहे. याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे, आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या संशयितांचे नमुने घेतले जाणार आहेत. तसेच नागरिकांनी स्वत:हून तपासणी करण्यास पुढे यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

कडक तपासणी होणार 

प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमारेषांवर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. याठिकाणी कुणी आत येण्याची किंवा बाहेर जाण्याची आगळीक केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे. आपली स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com