नाशिकमधील तिघे लाचखोर पोलीस निलंबित; जाधव यांच्या कोठडीत एक दिवसांची वाढ

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात लाचेची मागणी करून नाशिक पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तिघा पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

यासोबतच वादग्रस्त सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी एक दिवसाची वाढ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी (दि.५) नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे या दोघांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तर, शुक्रवारी (दि. ६) सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहाथ अटक केली होती.

याप्रकरणी नानासाहेब नागदरे, सुभाष देवरे यांना नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी निलंबित केले आहे. त्यासंदर्भात अहवाल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांना सादर करण्यात आला आहे.

तर, सातपूरचे विलास जाधव यांना पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले असून त्यासंदर्भातील अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला आहे.

दरम्यान, विलास जाधव यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *