गर्भगृहात प्रवेशबंदीचे जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही आदेश नाहीत – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण
स्थानिक बातम्या

गर्भगृहात प्रवेशबंदीचे जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही आदेश नाहीत – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

महाशिवरात्रीला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. यावेळी महाअभिषेक, आरतीवेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह दर्शन बंद ठेवावे, अशी मागणी ग्रामीण पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

दरम्यान, याबाबतचे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच जिल्हा प्रशासनाने याबाबत कुठलाही आदेश काढण्यात आला नसल्याचे जाहीर केल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाने हे पत्र मंदिर ट्रस्टला दिले असून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. येत्या शुक्रवारी (दि.21) महाशिवरात्र असून त्र्यंबकनगरी उत्सवासाठी सजली आहे. रोज देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकला दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला हा भाविकांची संख्या लाखाच्या घरात जाते.

या दिवशी येथे देश-विदेशातून भाविक दर्शन, पूजा, अभिषेक करण्यासाठी येतात. यावेळेस महाशिवरात्र शुक्रवारी (दि.21) आल्यामुळे बुधवारी शिवजयंतीच्या शासकीय सुटीपासूनच त्र्यंबकनगरीत शिवभक्तांची मांदियाळी उसळण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात या उत्सवाची तयारी सुरू आहे.

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास खुले राहणार आहे. पण असे असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव या दिवशी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेदरम्यान मंदिरातील गर्भगृहात दिला जाणारा प्रवेश बंद ठेवावा अशा सूचनेचे पत्र ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी जिल्हा प्रशासनाला दिले  होते.

मंदिरात गर्भगृहात पुरुषांना सोवळे नेसून जाता येते. अर्थात, सध्या ठराविक वेळेतच जाता येते. याबाबत नेहमी वाद होतात. सकाळच्या वेळी गाभार्‍यात वर्दळ वाढल्यास त्याचा परिणाम रांगेवर होतो. दर्शनासाठी भाविकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यांना दर्शनही मिळत नाही.

ते बघता गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होता काम नये यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय न घेता हे पत्र मंदिर प्रशासन ट्रस्टला दिले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून कुठलाही आदेश काढण्यात आलेला नाही

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहा मध्ये प्रवेश बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाहीत. परंतु सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता गर्भगृहात होणारी गर्दी व त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय विचारात घेता या प्रवेशावर नियंत्रण ठेवावे तसेच स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवून मंदिर परिसरातील गर्दीवरही योग्य ते नियंत्रण ठेवावे अशा सूचना ट्रस्टला देण्यात आल्या आहेत तसेच पोलीस विभागासही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यासंदर्भात ट्रस्ट व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक 

Deshdoot
www.deshdoot.com