Friday, April 26, 2024
Homeनाशिकनववर्षात बळीराजा आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर

नववर्षात बळीराजा आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर

नाशिक । प्रतिनिधी

यंदा नववर्षाची सुरुवात शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. शासकीय मदत, समुपदेशन आदी उपाययोजनांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे आकडेवारीवरून दिसते. या दोन्ही महिन्यात एकही आत्महत्या नसून यापुढेदेखील कोणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

गतवर्षी पडलेला सुका व ओला दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा असे अस्मानी व सुलतानी दुहेरी संकट बळीराजावर कोसळले होते. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी बेजार झाला होता. गत वर्षातील जानेवारी व फेबु्रवारी या दोन महिन्यांत 11 शेतकर्‍यांनी जीवन संपवले होते.

मागील वर्ष शेतकर्‍यांची परीक्षा घेणारे ठरले होते. कमी पर्जन्यमानामुळे जानेवारी ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्याने दुष्काळाचे चटके सोसले होते. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. जिल्ह्यात कधीनव्हे एवढी टँकरची संख्या 424 पर्यंत पोहोचली होती. पशुधन जगविण्यासाठी प्रशासनाला चारा छावण्या उभाराव्या लागल्या होत्या.

त्यात कर्जबाजारीपणा, बँकांकडून कर्जाच्या वसुलीचा तगादा, पिकाला न मिळणारे भाव यामुळे बळीराजा पिचला होंता. या संकटांना कंटाळून त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. त्यानंतर अतिवृष्टी व पूर परिस्थितीने अनेक गावातील पिके आडवी केली; तर वर्ष संपताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलां होता.

जिल्ह्यातील 7.5 लाख हेक्टरपैकी 5.5 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत होता. 2019 या वर्षात जिल्ह्यात 69 शेतकर्‍यांनी आत्महत्या करून जीवन संपवले होते.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष टास्कफोर्स गठित करावी लागली होती. यंदा मात्र, नवीन वर्ष शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. पीएम किसान योजना, पीकविमा, महात्मा फुले कर्जमाफी या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. तसेच, गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला असून जिल्ह्यातील धरणात 81 टक्के इतका पाणीसाठा आहे.

त्यामुळे यंदा पाणीबाणीची समस्या मिटल्याने दुष्काळाची तीव्रता कमी असणार आहे. एकूणच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व निसर्गाची कृपा यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वर्षाच्या प्रारंभीच्या दोन महिन्यात एकही आत्महत्या नसल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.

शेतकरी लढवय्या

सर्व विभाग संवेदनशील व समन्वयाने काम करत आहे. मुळात शेतकरी हा लढवय्या आहे. तो संकटापुढे हार पत्करणारा नाही. आत्महत्या रोखण्यात यश आल्याचे समाधान आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या