मालेगावी पोलिसांवर कुठलाही हल्ला किंवा दगडफेक नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका
स्थानिक बातम्या

मालेगावी पोलिसांवर कुठलाही हल्ला किंवा दगडफेक नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

मालेगावमधील अडचणीचे परिसर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे सील केले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या जमावाने आज सकाळी पावणेआठच्या सुमारास पूर्व व पश्चिम भागास जोडणारा संगमेश्वर काट्या हनुमान मंदिरालगत मोसम नदीवरील अलाम्मा इक्बाल पुलावर पोलिसांनी लावलेली बॅरीकेटिंग तोडून शहरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्याचा प्रकार घडला. घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाल्यामुळे जमावाने पळ काढला. वेळी कुठलाही हल्ला पोलिसांवर झालेला नाही, तसेच दगडफेकदेखील झालेली नाही अशी माहिती पोलिस सूत्रांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

अधिक माहिती अशी की, मालेगाव मध्य विधानसभेचा मतदार संघ असलेल्या भागात लहान मोठी गल्लीबोळ आहेत. याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर एक-एक करत २० पेक्षा अधिक अटकाव क्षेत्र जाहीर करण्यात आले असून करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी परिसर सील केला आहे.

मात्र याठिकाणी जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे या भागात मिळत नाहीत, झोपडपट्टीतील नागरिकांचे हाल होत आहेत. पोलीस सीमा पार करू देत नाहीत केल्यास  मारहाण होते या कारणावरून हा जमाव संतप्त झाला होता. यामुळे या जमावाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जाण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, या अधिकाऱ्यांनी पोलीस कुमक घेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमावाने वरील तक्रारींचा पाढा वाचला.

करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भागात सील करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी परिसर सील करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांनी घरातच थांबावे सहकार्य करावे अशी समजूत अधिकाऱ्यांनी काढल्यानंतर परिसर निर्मनुष्य करण्यात आला.

पोलिसांवर दगडफेक व कुठलाही हल्ल्याचा प्रयत्न नाही – चव्हाण

काही तरुणांनी अल्लम्मा इकबाल पुलावर धाव घेत लावलेल्या बॅरीकेटिंग तोडत   गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला होता.  मात्र, घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेतल्याने जमावाने पळ काढला, यावेळी दगडफेक वा हल्ल्याचा कुठलाही प्रकार घडला नाही असे स्पष्टीकरण पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी ‘देशदूत’ला सांगितले. या घटनेवरून पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवू नये असे आवाहनदेखील चव्हाण यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com