तेजस पुरस्कार मुलाखत :  न्यायव्यवस्थेत करिअर करा- अ‍ॅड.संदीप मोरे
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : न्यायव्यवस्थेत करिअर करा- अ‍ॅड.संदीप मोरे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

वकिली क्षेत्रातली घरातील पहिलीच व्यक्ती,
स्वतःच स्वतःचे स्थान निर्माण करून भावाला देखील वकील बनवले,
दोन्ही भावंडाना स्वतःच्या पायावर उभे केले,
वकिली करताना त्यातून समाजासाठी काम.

माझा जन्म त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तुपादेवी येथील. तेथे आमची शेती आहे. आमचं शेतकरी कुटुंब आहे. मला आई, वडील एक मोठा आणि एक लहान भाऊ आहे. माझं बालपण तिथेच गेलं. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि बारावी पर्यंतचं शिक्षण नूतन त्र्यंबक विद्यालयात झालं. मी बी.कॉम पूर्ण केलं. नंतर मला सीए व्हायची इच्छा होती परंतु परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं. म्हणून मित्राच्या सल्ल्याने एलएलबीला प्रवेश घेतला. या सगळ्या प्रवासात शिक्षणाबरोबरच नोकरी करायचो.

४ जुलै २००९ ला मला सनद मिळाली आणि नाशिकच्या कोर्टात रुजू झालो. पुढचे सहा महिने मी ज्युनिअरशिप केली. १० मार्च २०१० ला मी माझा पहिला स्वतंत्र सूट सादर केला. ही केस मुलींच्या हक्कांसाठीची होती. यामध्ये माझ्या समोर २१ वर्ष प्रॅक्टिस असणारे वकील होते. या केसचा निकाल २०१८ ला माझ्या बाजूने लागला. २०१० नंतर माझं स्वतःच असं काम चालू झालं होतं. २०१९ पर्यंत मी प्रॅक्टिस केली. आत्तापर्यंत मी एकूण ४०० केस लढलो. त्यापैकी २५० केसेस अजून कोर्टात सुरू आहेत. उर्वरित केसेसपैकी जवळजवळ ५० ते ७० केसेस अशा आहेत की ज्या कोर्टात न जाता सोडवल्या आहेत. आदिवासी लोकांच्या काही केस मी चॅरिटीच्या माध्यमातून सोडवल्या. म्हणजे कमीत कमी पैसे भरायला सुद्धा त्यांच्याकडे काही नसायचे तेव्हा मी माझ्याकडून त्यांची मदत करायचो. या दरम्यान मी माझी घराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली.

या १० वर्षाच्या काळात समाजासाठी काहीतरी करावं हे मनात होतं. त्यानुसार सामाजिक कामातही माझा सहभाग आहे. मी ज्या भागात राहतो तो भाग फारसा प्रगत नाही. त्या भागात महिलांना येणार्‍या अडचणी सोडवताना मला बर्‍याच ठिकाणी म्हणजे अंगणवाडी सेविका, महिला बचत गट अशा विविध ठिकाणी हुंडाबंदी, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा कायदा अशा बर्‍याच विषयांवर प्रबोधन करण्यासाठी बोलावलं जायचं. याचबरोबर मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात संविधान दिनाला संविधानाबद्दल बोलण्यासाठी मला प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब होती.

वकिली व्यवसायात येण्यासाठी कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं. कोणाच्याच ओळखी नव्हत्या. त्यामुळे शिफारशीसाठी देखील कोणी नाही. जे करायचं ते स्वतः अभ्यास करून स्वतःला सिद्ध करायचं होतं. आर्थिक परिस्थिती नव्हती, पण मनात जिद्द होती. अजून एक आव्हान म्हणजे माझं बारावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून आणि पुढचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून. त्यात कोणतेही क्लास नाही. कॉलेजचे लेक्चर्स आणि स्वतःचा अभ्यास करणं माझ्या हातात होतं. या सगळ्यावर मात करून मला सनद मिळाली. माझे छंद म्हणजे मला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप आवडतं. साधारण १० वी, १२ वी च्या दरम्यान मला बासरी वादनाचा छंद होता. अभ्यास, वाचन मी नेहेमी झाडाखाली, तलावाजवळ बसून करायचो. तिथे असणारी शांतता, पक्षांचे आवाज, वार्‍याचा आवाज याविषयी मला प्रचंड प्रेम आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला मी ४०० झाडांची लागवड केलेली आहे. याच झाडांच्या माध्यमातून मी जिरायती शेती बागायती केली. आपल्या यशाच्या मागे आपले छंदही तेवढेच कारणीभूत असतात, असं मला वाटतं.

आजच्या तरुण पिढीला मी हे सांगेन की, आपल्याला वाटतं की आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी मिळू शकत नाही तर असं नाहीये. प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच येतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल पण आपलं ध्येय निश्चित असेल आणि प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. तरुण वर्गाला न्यायव्यवस्थेत येण्यासाठी मी नक्कीच प्रोत्साहन देतो. कितीही म्हंटलं कोणतीही सामान्य व्यक्ती असो ती शेवटचा पर्याय म्हणून न्यायव्यवस्थेला निवडते. माझं तरुण पिढीला आवाहन आहे की लोकशाहीच्या या स्तंभाकडे तुम्ही नक्की यावं, आपल्याकडून जेवढं योगदान देता येईल तेवढं द्यावं.

Deshdoot
www.deshdoot.com