एस टी महामंडळाला निफाड न्यायालयाचा दणका; फिर्यादीला भरपाई न दिल्याने बसची जप्ती
स्थानिक बातम्या

एस टी महामंडळाला निफाड न्यायालयाचा दणका; फिर्यादीला भरपाई न दिल्याने बसची जप्ती

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

निफाड |  प्रतिनिधी

वेळ सव्वा पाच वाजेची लासलगाव आगराची कसारा लासलगाव बस क्र एम एच 14 बी टी 3812 ही निफाड बसस्थानकात दाखल झाली आणि निफाड कोर्टात असलेले कोर्टाचे कर्मचारी, वकील हे बस जवळ गेले आणि क्षणात बस जप्त करण्याची कारवाई सुरू झाली.

अचानक झालेल्या या प्रकाराने बस चालक,वाहक आणि बसमधील प्रवासी अवाक झाले… हा काय प्रकार आहे? असे आश्चर्य कुतूहल निर्माण झाल्यानंतर घडत असलेला प्रकार सत्य असून कारवाईला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले.

याबाबत सर्व प्रकार समोर आला. 27/9/15 रोजी कोकणगाव फाटा येथे पिकअप व्हॅनला नंदुरबार आगाराने धडक दिल्याने या गाडीतील 3 लोक मृत झाले होते.

यामध्ये नरेंद्र पंढरनाथ धनवटे हे मृत होते धनवटे यांच्या पत्नी सुनीता यांनी महामंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार कोर्टात केस सुरू झाल्यानंतर सुनीता यांनी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार आगार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एन डी पटेल रोड नाशिक यांच्या विरोधात दावा दाखल केला.

सर्व बाबी तपासून कोर्टाने फिर्यादी सुनीता यांना परिवहन महामंडळाने भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र वेळोवेळी भरपाई न दिल्याने 7 डिसेंबर रोजी महामंडळाची बस जप्त करण्याचे आदेश काढले.

यात 23 लाख 37 हजार 731 रु व व्याज अशी भरपाई आहे ही भरपाई न दिल्याने कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवार दि 10 रोजी सायं 5 वाजेच्या दरम्यान निफाड कोर्टाचे मुख्य बिलिप पी डी लोंढे,बिलिफ पी पी सावंत,ए आर घोलप तसेच तक्रारदार सुनीता धनवटे त्यांचे वकील ऍड उत्तम कदम,ऍड स्मिता कदम,ऍड संदीप पवार हे निफाड बस स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांनी लासलगाव आगाराची कसारा लासलगाव बस क्र एम एच 14 बी टी 3812 ही बस जप्त करीत असल्याचे सांगून कारवाई सुरू केली.

अचानक झालेल्या कारवाईमुळे बस मधील प्रवासी चालक एस सी जाधव,वाहक एस बी गवळी यांनी दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. ही बस जप्तीची कारवाई पुर्ण झाल्यानंतर निफाड जिल्हा न्यायालयात घेऊन जाणार असून भरपाईची रक्कम न भरल्यास लिलाव करून फिर्यादीचे पैसे दिले जाणार असल्याचे वकिलांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com