राज्यस्तरीय वकील परिषद 15 फेब्रुवारीला; महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडून आयोजन
स्थानिक बातम्या

राज्यस्तरीय वकील परिषद 15 फेब्रुवारीला; महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडून आयोजन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघाच्या वतीने पहिली राज्यस्तरीय वकील परिषदेचे 15 व 16 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, मुख्य समन्वयक अ‍ॅड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा न्यायालय आवारातच 15 फेंब्रुवारीला या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. अ‍ॅड. भिडे यांनी सांगितले, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या नवीन कार्यकारिणीने कामकाजास सुरुवात केल्यानंतर पहिल्या राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याने जिल्हा न्यायालयातच या दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मार्चिंग टुवर्ड्स स्पिडी मॉडर्न ज्युडीशिअरी’ असे कामकाजाचे सूत्र आखून परिषदेत चर्चा होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व वकील वर्गाने या परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जलद न्यायदान हा पक्षकाराचा मूलभूत अधिकार आहे; त्यासाठी अंमलबजावणीसाठीची माध्यमे व उपाय, सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा पातळीवरील न्यायालयाचे विकेंद्रीकरण होणे, ही काळाची गरज आहे. वकिली व्यवसायापुढील नवीन आव्हाने आणि उपाय, सक्षम, प्रभावी आणि मोफत कायदा सहाय्य व मूलभूत अधिकार या विषयांवर चर्चा होणार असून त्यात विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Deshdoot
www.deshdoot.com