Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशश्रीनगर : बर्फाच्या हिमस्खलनात चार सैनिक ठार

श्रीनगर : बर्फाच्या हिमस्खलनात चार सैनिक ठार

श्रीनगर : मंगळवारी उत्तर काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलनाच्या घटनेत चार सैनिक ठार झाले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये एका सैनिकी कॅम्प हिमस्खलनाच्या कचाट्यात सापडला. त्यामधील अनेक सैनिक बेपत्ता असल्याचे समजते. या घटनेत भारतीय लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर याचवेळी बांदीपोराच्या गुरेझ सेक्टरमध्ये आर्मी पेट्रोलच्या गस्तीत झालेल्या हिमवृष्टीमुळे एक जवान शहीद झाला.

दरम्यान उत्तर काश्मीरमधील बर्‍याच भागात मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिमस्खलनाच्या घटना घडल्या. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात हिमस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बेपत्ता जवानांना शोधण्यासाठी एआरटीचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

- Advertisement -

नुकत्याच सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. सियाचीन जगातील सर्वात उंचावरील ठिकाण म्हणून ओळखले जाते. तीन दिवसांपूर्वीच सियाचीनच्या दक्षिणेकडील भागात हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी सियाचीन ग्लेशियर येथे झालेल्या भीषण हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील चार सैनिक ठार झाले होते.

सियाचीनमध्येसुद्धा अशा प्रकारच्या अपघातात भारतीय लष्कराच्या शेकडो जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. आकडेवारीनुसार सन १९८४ पासून सियाचीनमध्ये हिमस्खलनाच्या घटनांमध्ये ३५ अधिकाऱ्यांसह १ हजारहून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. २०१६ मध्ये अशाच घटनेत मद्रास रेजिमेंटचा शिपाई हनुमानंतप्पा यांच्यासह एकूण १० लष्करी जवानांचा मृत्यू बर्फात अडकल्याने झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या