
मालेगाव । प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यास्तव महानगरपालिकेतर्फे शहरातील चारही प्रभागांच्या कार्यक्षेत्रात 17 ट्रॅक्टरसह अग्निशमन दलाच्या दोन बंबांव्दारे जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.
जंतूनाशक फवारणीसह धुरळणी जास्तीतजास्त होण्याच्या दृष्टीकोनातून यंत्रणेस निर्देश देण्यात आले असल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.
शहरातील प्रभाग 2 व 3 च्या कार्यक्षेत्रात आज अग्निशमन दलाच्या दोन बंबांव्दारे सोडियम हायपोक्लोराईड या किटकनाशकाचे द्रावण तयार करून त्याची फवारणी किदवाईरोडपासून सुरू करण्यात आली.
उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे, विद्युत अधिक्षक अभिजीत पवार, अग्निशमन अधिक्षक संजय पवार, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी अधिकारी जातीने या फवारणीवर लक्ष ठेवून होते. संपुर्ण शहरात जंतूनाशक फवारणी व धुरळणी सातत्याने करण्याचे नियोजन यंत्रणेतर्फे करण्यात आले असून अग्निशमन बंबांचा देखील वापर केला जात असल्याने ही फवारणी अधिक प्रभावी ठरत आहे.