नाशिकचा शेतमाल पोहोचणार देशाच्या कानाकोपऱ्यात; स्पाईस जेट देणार कृषी कार्गो सेवा
स्थानिक बातम्या

नाशिकचा शेतमाल पोहोचणार देशाच्या कानाकोपऱ्यात; स्पाईस जेट देणार कृषी कार्गो सेवा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ओझर येथील विमानतळाहून प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. नाशिकमधील शेतमाल राज्सयाराज्हयांत पोहोचावा यासाठी लवकरच कृषी कार्गो सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्पाईसजेटने नाशिकहून पूर्णवेळ कार्गो सेवा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कांदा, डाळींब व द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. कार्गो सेवेमुळे ग्रामीण भागातील शेतमाल अपेक्षितस्थळी नियोजीत वेळेत पोहोचणार आहे. स्पाईस जेटच्या माध्यमातून नाशिकहून दिल्ली, गुवाहाटी, बेंगलोर या शहरांत ही सेवा दिली जाईल असे स्पाईस जेटने स्पष्ट केले आहे. परंतु ही प्राथमिक पाठपुरावा असून लवकरच याबाबत शासन अधिकृत निर्णय घेणार आहे.

ओझर विमानतळावरुन सध्या नाशिक ते दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद याठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरु आहे. जेट एअरवेजने नाशिकमधून दिल्लीला सेवा देणे सुरु केल्यानंतर यावेळी मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूक होत होती. एकीकडे दोन्ही बाजूंनी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आणि दुसरीकडे कार्गोची वेळेत वाहतूक, यातून जेट एअरवेजकला नाशिक फायद्यात होते.

मात्र, ही विमान कंपनी आर्थिक अडगळीत अडकल्यामुळे ही सेवा नाईलाजाने बंद झाली. उत्तम प्रतिसाद मिळूनही सेवा बंद करावी लागल्यामुळे नाशिककरांची सपशेल नाराजी होती.

यानंतर एअर इंडियाने यासाठी पुढाकार घेतला पण तीही सेवा अद्याप सुरु झालेली नाही. दरम्यान, नाशिकच्या कार्गो सेवेलाही गती मिळणार  असल्यामूळे चैतन्याचे वातावरण आहे.

कार्गो सेवेमुळे उत्पादनाची गुणवत्ताही टिकून राहणार आहे. माल रेल्वेपर्यंत पोहोचवायला लागणारा ट्रक खर्च, डॉकयार्डपर्यंत पोहोचविण्यासाठी वॅगनचा खर्च, माल उतरविण्यासाठी लागणारी मजुरी, शीप डॉकयार्डवर लागेपर्यंत शीतगृहाचा खर्च आदी वाचणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

शासनस्तरावर यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले आहे. कार्गोला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सुरुवातील ५० टक्के सबसिडीने ही सेवा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देईल असेही गोडसे म्हणाले. केंद्र सरकारकडून शेतमालाच्या वाहतूकीसाठी लवकरच विशेष योजना आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com