Blog : इष्टापत्ती

Blog : इष्टापत्ती

लॉक डाउन सुरू होऊन आता जवळपास 20 दिवस झाले आहेत. मुलांना तर त्याही अगोदर पासून सुट्ट्या मिळाल्या आहेत. एरवी सुट्ट्या म्हंटलं की, मुलांच्याच काय तर अगदी मोठ्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय. आता हेच बघा ना या आठवड्यात शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा मंगळवार अशा लागून सुट्ट्या आल्या आहेत, सोमवारची एक सुट्टी टाकली की झालं मस्तपैकी एक फॅमिली ट्रिप झाली असती.

त्यानंतर मुलाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या . मग काय धमालच धमाल किती प्लॅन केले असते आपण. कुठे कुठे फिरायला जायचं, काय काय करायचं, लग्न कार्य, पाहुणे रावळे. किती मज्जा आली असती. पण आज मात्र गोष्ट वेगळी आहे. आपण सगळे सुट्टीवर आहोत पण सक्तीच्या. आणि कोणत्याही गोष्टीची सक्ती ही त्रास दायकच असते.

त्यामुळे ही सक्तीची सुट्टी देखील सगळ्यांना नकोशी झालीय. सुरुवातीच्या आठवड्यात थोडी excitement होती . कधी नव्हे ते सगळे घरात आहेत. कुटुंब एकत्र आलंय, काहीतरी वेगळा अनुभव वाटत होता त्यामुळे उत्साहाच्या भरात सगळं काही करून झालं. काय काय नसेल केलं आपण? पत्ते खेळले, गाणी म्हंटली, जुने फोटो पाहिले, आवडते सिनेमे पाहिले, खूप आराम केला, साफसफाई केली, वाचन केलं, गाण्याच्या भेंड्या खेळल्या, एकमेकांना चॅलेंज दिली, घेतली.

वाटलं होत इतक्यात निघून जातील हे दिवस आणि सगळं काही ठीक होईल, पण जसजसे दिवस जाऊ लागले तस आता सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलंय, हे प्रकरण वाटत तेवढं सोपं नाही. एवढ्यात नाही उरकायच हे. त्यामुळे आता मात्र भीती वाटायला लागलीय. युरोप अमेरिकेकडे पाहिलं की काळजात उगाचच धडकी भरते. घरात राहायचं म्हणजे तरी किती दिवस? तरी सगळेजण आपलं हे स्थान बद्धत्व कसं आरामदायी होईल याची काळजी घेताय.

दूरदर्शन वर रामायण महाभारतासह कित्येक जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जातायेत , अनेक वाहिन्या आपल्या ग्राहकांच मन कसं प्रसन्न राहील याची काळजी घेतायेत. ऑफिसेस आपल्या employees ची शाळा आपल्या विध्यार्थ्यांची तर बँका आपल्या खातेधारकांची मनापासून काळजी घेताय.

वर्तमानपत्रे बंद असली तरी इ वर्तमानपत्रे वाचायला मिळतायेत , काही ठिकाणी दूध , भाजीपाला , किराणा , औषधे अशा अत्यावश्यक वस्तू घरपोच मिळतायेत . डॉक्टर , नर्सेस , पोलीस जीव तोडून काम करतायेत , एवढं करून तुम्ही आजारी झालात तर सरकारी खर्चाने मोफत तपासण्या, उपचार सुरू आहेत.

सहजच माझ्या मनात विचार आला आतापर्यंत या कॉमन मॅन चे एवढे लाड कधीच झाले नसतील . भरपगारी सुट्ट्या , आरामात घरी रहायचं मस्त खायचं प्यायचं नि झोपायचं वरून सगळे जण ओरडून सांगतायेत तुम्ही काही करू नका फक्त घरी रहा . तरी जणू काही आम्हाला कोणीतरी तुरुंगात टाकल्या सारख वाटतंय.

का सुख बोचतंय ? तर नाही सुखाची व्याख्या पण परस्थिती नुसार बदलत असते तसच काहीसं आमचं झालंय कोरोनाच्या या अनामिक भीतीने सगळ्यांच आयुष्य पार ढवळून गेलंय . सगळीकडे एक अनिश्चितता पसरली आहे त्यामुळे या सुट्ट्या देखील नकोशा वाटतायेत . भविष्याची चिंता सगळ्यांनाच सतावतेय .

पण आता होणाऱ्या गोष्टी तर होणारच आहेत , त्यावर फारसा विचार करून काही हाताला लागणार नाही सध्या तरी फक्त काळजी घेणं आणि नियम पाळणं आपल्या हातात आहे. तेव्हा या आलेल्या आपत्तीला आपण इष्टापत्ती समजायला काय हरकत आहे ? खरं तर या आपत्ती मुळे खूप जणांचं जीवन बदलून गेलंय, हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे खूप हाल होतायत, ज्यांचे आप्त स्वकीय या रोगाला बळी पडले त्यांच्या दुःखाची तर तुलनाच नाही.

लाखो लोक संशयित म्हणून आज quarantine आहेत, त्यांचं जीवन पार विस्कळीत झालंय , सेवांवर प्रचंड ताण आहे , जगाची अर्थव्यवस्था कोलमडून गेलीय याची पुरेपूर जाणीव आहे तरी देखील मी हा विचार करतेय . या वैश्विक संकटाने आपल्याला खूप काही शिकवले आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साधं सात्त्विक कौटुंबिक जीवन जगण्याची संधी मिळाली . ज्या आईवडिलांची मुलं शिक्षणासाठी , नोकरीसाठी कित्येक दिवसांपासून त्यांच्यापासून दूर होती त्यांना आपल्या मुलांच्या सहवासात राहायचं सुख आज मिळतंय . घरातल्या सगळ्यांना एकमेकांच्या स्वभावातील गुण दोषही प्रकर्षाने जाणवायला लागलेत.

सगळी काम मिळून मिसळून केल्यामुळे एकमेकांच्या कष्टाची जाणीव होऊ लागलीय . मूल ऑफिस मध्ये नेमकं काय करतात ते घरच्यांना कळू लागलंय. वाचन, लेखन, चित्रकला, पाककला असे छंद जोपासायला वेळ मिळू लागलाय. कधी नव्हे ते डिजिटल इंडिया च महत्व आपल्याला कळतंय.

आपण सगळे जण आता काळाची गरज म्हणून या गोष्टी करायला शिकतोय . कित्येक जणांनी पहिल्यांदाच ऑनलाइन बिल भरली असतील. ज्या गृहिणी आजपर्यंत ऑनलाइन व्यवहारांपासून दूर होत्या.

त्यांनीही हा प्रयोग करून पहिला असेल. मुख्य म्हणजे आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी आपण विनाकारण बाहेर गर्दी करीत होतो त्यापैकी कित्येक गोष्टी आपण घर बसल्या करू शकतो हे आपल्याला समजले . स्वछतेच महत्त्व तर आपल्याला समजलंच पण या दुराव्यामुळे माणसाचं महत्त्व देखील कळलं.

अगदी व्यवहारी विचार करायचा झाला तर, आपले किती तरी पैसे वाचले जसे बाहेर जाण्यासाठी लागणारा पेट्रोल खर्च , बस , रेल्वे , विमान यांचं भाडं वाचलं. बाहेर जायचं नाही म्हणून इस्त्रीच्या कपड्यांचा खर्च वाचला. महिला वर्गाची ब्युटी पार्लर ची वारी चुकली. मॉल मध्ये विनाकारण केला जाणारा खर्च वाचला.

घरात अगदी उच्च तंत्रज्ञान असलेला टीव्ही असला तरी बाहेर जाऊन नाटकं, सिनेमे पाहण्याचे पैसे वाचले. बचतीचे, आरोग्याचे महत्त्व कळले. हे ही नसे थोडके.

मोठमोठया जागतिक महासत्ताचा शब्दशः माज उतरला. जगा आणि जगू द्या या तत्वाची प्रचिती आली, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गावरचा ताण कैक पटीने कमी झाला. पृथ्वीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला. प्रदूषणाचा विळखा कमी झाला. या सर्व जमेच्या बाजूंचा विचार केला तर हे जागतिक संकट म्हणजे आपल्यासाठी इष्टापत्ती च ठरलंय अस म्हणायला हरकत नाही. फक्त हा काळ आता अजून लांबायला नको, झाला एवढा धडा पुरे झाला. फक्त यातून सावरल्या नंतर सुद्धा माणसाने निसर्गाने शिकवलेल्या गोष्टी लक्ष्यात ठेवायला हव्या तर आपल्या जगण्याची प्रत नक्की सुधारेल नाही तर आहेच पुन्हा, ये रे माझ्या मागल्या…

तनुजा सुरेश मुळे (मानकर), नाशिक (लेखिका ब्लॉगर आहेत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com