महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ वर सोलर ब्लिंकर्स; अपघात रोखण्यासाठी पुढाकार; शिर्डी महामार्गासह सिन्नर शहरात उभारणी
स्थानिक बातम्या

महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ वर सोलर ब्लिंकर्स; अपघात रोखण्यासाठी पुढाकार; शिर्डी महामार्गासह सिन्नर शहरात उभारणी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर । अजित देसाई

सिन्नर नाशिक महामार्गासह सिन्नर शहरातून जाणाऱ्या पुणे महामार्गावरील अधिसूचित करण्यात आलेल्या अपघातप्रवण जागांवर (ब्लॅक स्पॉट) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोलर ब्लिंकर्स कार्यान्वित केले आहेत.

२४ तास सुरु असणाऱ्या या ब्लिंकर्समुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अपघाती जागांची माहिती दुरूनच मिळणार आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या शिर्डी महामार्गावरील अपघातांची मालिका नियंत्रित होण्यात मदत होणार आहे.

सिन्नर शहरातून जाणाऱ्या पुणे महामार्गासह संगमनेर नाक्यापासून शिर्डी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपायोजना करण्याची सूचना गेल्या जानेवारीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी बांधकाम विभागाकडे केली होती.

काही महिन्यांपूर्वी सिन्नर बायपास (नाशिक फाटा ) ते संगमनेर नाका आणि संगमनेर नाका ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावापर्यंत अपघाती जागांवर गतिरोधक उभारण्यात आले होते.

मात्र, हे गतिरोधक दिवसा तसेच रात्रीच्या वेळी देखील दुरून दिसत नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच होते. अपघात क्षेत्र म्हणून निश्चित केलेल्या जागा चालकांना दुरून लक्षात याव्यात यासाठी तातडीने नारंगी उजेड देणारे ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश आमदार कोकाटे यांनी कार्यकारी अभियंता विवेक माळोदे, उपविभागीय अभियंता सी.आर. सोनवणे यांना दिले होते.

त्यानुसार गेल्याच आठवड्यात सर्व ब्लॅक स्पॉटवर महामार्ग विभागाकडून ब्लिंकर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. सिन्नर शहरात उद्योगभवन पासून आडवा फाटा, गावठा येथील मारुती मंदिर ते मनेगाव फाटा दरम्यान अपघातारोधक उपाययोजना करण्यात आल्या असून शिर्डी महामार्गावर जुनी केला कंपनी पासून एस.जी. पब्लिक स्कुल, खोपडी येथील वडांगळी फाटा, देवपूर फाटा ते पाथरे दरम्यान हे ब्लिंकर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्गदर्शन होणार आहे.

हे आहेत ब्लॅक स्पॉट

सिन्नर शहरात उद्योगभवन येथील दुभाजक सुरु होणारी जागा, एसटी कॉलनी, सिन्नर महाविद्यालय , सतत वर्दळ असणारा आडवा फाटा, गावठा येथील मारुती मंदिर, संगमनेर नाका , मनेगाव फाटा ही ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून सूचित करण्यात आले आहेत.

तर शिर्डी महामार्गावर केला कंपनीजवळ दुभाजक सुरु होतात ती जागा, कुंदेवाडी फाटा, वडांगळी फाटा, खोपडी बसस्थानक, देवपूर फाटा, मिरगाव फाटा, पाथरे गावाजवळील अपघाती वळण व पाथरे बसस्थानक ही ठिकाणे समाविष्ट असून या प्रत्येक ठिकाणी गतीरोधकांसह ब्लिंकर्स देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीकडून हे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.

– स्वप्नील पाटील , शाखा अभियंता

शहरातील मार्गावर पथदीप

सिन्नर शहरातून शिर्डी व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. वाहनांच्या वेगामुळे उद्योगभवन ते संगमनेर नाका या दरम्यान सतत अपघात होतात.

या जागा निश्चित करून तेथे गतीरोधक आणि रात्रीच्या वेळीही फायदेशीर ठरणारे ब्लिंकर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग याठिकाणी निश्चित मंदावेल.

येत्या काळात आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार उद्योगभवन ते संगमनेर नाका दरम्यान पथदीपांचे काम मार्गी लागणार असून त्यामुळे शहरातून जाणारा महामार्ग अधिक सुरक्षित होईल.

– विठ्ठल उगले, माजी नगराध्यक्ष

Deshdoot
www.deshdoot.com