साध्या वेशात महिला पोलीसच उतरल्या रस्त्यावर; विशेष मोहिमेत सहा विकृत गजाआड
स्थानिक बातम्या

साध्या वेशात महिला पोलीसच उतरल्या रस्त्यावर; विशेष मोहिमेत सहा विकृत गजाआड

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

महिला सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहीम, ऑलआऊट ऑपरेशनमध्ये विविध ठिकाणी महिलांची छेडखानी करण्याचा प्रयत्न करणार्‍या विकृतांना साध्या वेशातील महिला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.

कमलकुमार गिरधरलाल खेमानी (52, रा. चेतननानगर, इंदिरानगर), आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (30), अक्षी अमीर इस्माईल आत्रम (45, रा. दोघेही पंचवटी), हेमंत शिवाजी वाघ (33, रा. पारिजातनगर), भरत अभिमन पाटील (एकदंतनगर), गणेश परशुराम वरुडे (31, रा. दत्तमंदिर, नवीन नाशिक) अशी जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

हैदराबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने नाशिकमधील प्रामुख्याने उशिरा कामावरून परतणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महिला पोलीस सेवकांनी साध्या वेशात ठराविक ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्यांची छेड काढणार्‍यांना पोलिसांनी जेरबंद केले. शहरात विविध भागात अशा सहा जणांना अटक करण्यात आली.

कामावरून घरी परतणार्‍या महिलांचा एकटेपणा, कमजोरीचा रात्रीच्या काळोखाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले जातात. हे रोखण्यासाठी शहर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी साध्या वेशातील महिला सेवकांनी स्टिंग ऑपरेशन केले.

यामध्ये महिला पोलीस साध्या वेशात बसची वाट पाहत थांबल्या. पथकातील पुरुष दूर अंतरावर साध्या वेशात उभे राहिले. तसेच काही आजूबाजूला गस्त घालत होते. या महिलेची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असता त्याचे व्हिडीओ शूटिंग करून त्यांना जेरबंद करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com