मालेगावी आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह; एका करोना संशयिताचा मृत्यू

मालेगावी आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह; एका करोना संशयिताचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी

गत 24 तासात मालेगाव शहरासह दाभाडी, वडगाव येथे 6 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर फरान रुग्णालयात करोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने उपचार घेत असलेल्या रौनकाबाद भागातील 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

या रुग्णवाढीने शहरासह परिसरात बाधितांची संख्या 894 वर पोहचली असली तरी 826 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात करत घरवापसी देखील केली आहे.

आजमितीस येथील करोना उपचार केंद्रांमध्ये 66 रुग्ण उपचार घेत आहे. दरम्यान आज सकाळी प्राप्त अहवालात 74 पैकी सहा पॉझिटिव्ह तर 68 संशयित रुग्ण निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला.

समर्थ नगर भागातील चार वर्षीय बालिका पॉझिटिव्ह असल्याचे झालेले निदान मालेगावकरांना चिंताक्रांत करणारे ठरले. याच भागातील 50 वर्षीय पिता व 26 वर्षीय पुत्राचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला.

तर कँम्प भागातील मारवाडी गल्ली येथील 76 वर्षीय वृद्ध बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मनपा आरोग्य पथकांनी आज या बाधित रुग्णांच्या निकटवर्तीयांना तातडीने काँरन्टाईन करत त्यांचे स्राव नमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत.

दरम्यान, दाभाडी येथे तीन दिवसापूवीँ बाधित आढळून आलेल्या रुग्णांशी संपर्कात आलेली भवानी चौकातील 16 वर्षीय तरुणी पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. वडगाव येथे देखील 58 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थ चिंताक्रांत झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com