‘शिवभोजन’ थाळीच्या माध्यमातून गरीब व गरजू जनेतेची भुक भागणार
स्थानिक बातम्या

‘शिवभोजन’ थाळीच्या माध्यमातून गरीब व गरजू जनेतेची भुक भागणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

गरीब मजदुर लोकांची वर्दळ असलेल्या जिल्हा रुग्णालय, बाजारपेठा, बस व रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये या ठिकाणी ‘शिवभोजन’ थाळीच्या माध्यमातून केवळ दहा रुपयांत गरीब व गरजू जनतेची भूक भागणार आहे, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रेरणा महिला बचतगट संचलित बळीराजा रेस्टॉरंट येथे शिवभोजन केंद्राचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, उपायुक्त पुरवठा अर्जुन चिखले, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सिकर, पोलीस निरीक्षक अशोक भगत, प्रेरणा महिला बचतगट अध्यक्षा कविता कर्डक आदी उपस्थित होते.

ना. भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर पन्नासहुन अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. नाशिक जिल्हयामध्ये चार ठिकाणी याचे प्राथमिक स्वरूपात उदघाटन होत असून यातून दररोज सातशे नागरिकांना जेवण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन केंद्रावर स्वच्छ स्वरुपात आणि चांगल्या दर्जेचे जेवण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार शिवभोजन केंद्रांची व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. यास मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागात राबविण्यात येईल. शासनातर्फे सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी देण्यात येईल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. शासनाची ही अत्यंत महत्वाची योजना असून ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे अन्न देण्यात येणार आहे. या योजनेत सेंट्रल किचन व स्वयंसेवी संस्था यांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

प्रेरणा महिला बचतगट अध्यक्ष कविता कर्डक यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या की, शिवभोजन थाळी सर्वांना वरदान ठरलेली आहे, सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रयोग यशस्वी होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बचतगटांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शिवभोजन थाळी उदघाटन प्रसंगी भुजबळ यांनी लाभार्थ्यांना स्वहस्ते शिवभोजन थाळीचे वाटप केले.

Deshdoot
www.deshdoot.com