शिवजयंती आनंदात व शांततेत साजरी करावी; ना.रोड, दे.कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठकीत पोलीसांचे आवाहन
स्थानिक बातम्या

शिवजयंती आनंदात व शांततेत साजरी करावी; ना.रोड, दे.कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठकीत पोलीसांचे आवाहन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिकरोड । प्रतिनिधी

आगामी शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

येत्या 19 रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक नाशिकरोड पोलीस स्थानकाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस आयुक्त बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ते उत्तम आहेत. सोशल मिडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. समितीचे कार्यकर्ते स्वत:हून वर्गणी काढून हा उत्सव साजरा करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. मिरवणुकीत मद्यपान करू नये असे आवाहन त्यांनी केले. शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विशाल संगमनेरे यांनी या काळात दोन दिवस दारूचे दुकान बंद ठेवण्याची मागणी केली.

यावेळी बंटी भागवत, शाम गोहाड, बाळासाहेब शिंदे, नितिन चिडे, वामनराव बोराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजय खरात, सहा.पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वपोनि सूरज बिजली, सुनील रोहोकले, वाहतूक शाखेचे पोनि के.डी. पाटील होते. बैठकीस नगरसेवक जगदीश पवार, जयंत गाडेकर, सुनिल कांबळे, अतुल भावसार, किशोर जाचक, विक्रम कोठुळे, योगेश धोंगडे, गीता नवसे, चंदू महानुभव, शिवाजी हांडोरे, शिवा भागवत, नितिन खर्जुल, संतोष क्षिरसागर, मुन्ना अन्सारी, श्रीकांत मगर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सूरज बिजली तर आभार ईश्वर वसावे यांनी मानले. यावेळी सोनसाखळी चोरांना पकडणारे बीट मार्शल समीर चंद्रमोरे व दिनेश महाजन यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com