शिरपूर : एस.टी. चालक करोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

शिरपूर : एस.टी. चालक करोना पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

कोरोना विषाणूचा शिरपूर शहरात शिरकाव झाला असून करवंद नाका जवळीक भुपेश नगर परिसरातील पहिला रुग्ण आढळून आले आहे. 52 वर्षाच्या एस.टी. बस चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कन्टेमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र सन्नाटा दिसतो आहे.

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.13 मे पासून एस.टी. बसेस सोडण्यात आल्या. यात शिरपूर आगाराकडून महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील बिजासनी घाटात अडकून पडलेल्या असंख्य मजुरांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडण्यात आले. यापैकीच एका 52 वर्षीय बस चालकास कोरोनाने घेरले. हा चालक शहरातील भुपेश नगर परिसरातील रहिवाशी असल्याने या परिसरासह प्रमुख रस्त्यांवर बांबु बांधून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

या चालकासह एक तरुण चालक शासन आदेशानुसार कार्यरत होते. दोघेही छत्तीसगड राज्यच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडण्यासाठी गेले होते. दोन दिवसापूर्वी त्या चालकाने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी करून घेतली. मंगळवारी दि.19 मे रोजी रात्री या 52 वर्षे चालकाचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. चालकाची पत्नी व परिवारातील एकूण तीन सदस्यांचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
संपूर्ण शिरपूर शहरात तीन दिवसांच्या काळात हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. तसेच दि.2 जून पर्यंत कंटेन्टमेंट झोन असणार आहे. या दरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील असे प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी कळविले आहे.

चार जणांची कोरोनावर मात

धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून कोरोना विषाणूवर मात केलेल्या चार जणांना सुट्टी देण्यात आली. त्यात एका डॉक्टराचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 45 (धुळे जिल्ह्याबाहेरील सहा जण वगळता) जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूनेचे आतापर्यंत 80 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

या रुग्णांना निरोप देतांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीष चौधरी आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com