वृध्द दाम्पत्याचा कडब्याच्या गंजीत जळून मृत्यू ; घातपाताचा संशय ?

वृध्द दाम्पत्याचा कडब्याच्या गंजीत जळून मृत्यू ; घातपाताचा संशय ?

जयपूर लांडे शिवारातील खळबळजनक घटना

खामगांव तालुक्यातील शेतातील कडब्याच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत एका वृध्द शेतकरी दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने जयपूर लांडे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर दाम्पत्याने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे ? याबाबत पोलिस विभागाकडून तपास सुरु आहे. जयपूर लांडे येथील रहिवाशी श्रीकृष्ण लांडे (७५) व त्यांची पत्नी सौ. सईबाई लांडे (७०) हे दोघे काल सकाळी गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतात नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते.
परंतु दोघेही उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा भानुदास लांडे आणि
पुतण्या हे दोघे रात्री त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले. मात्र त्याठिकाणी दोघांचेही मृतदेह कडब्याच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत दिसून आले. सदर दृश्य पाहून दोघेही भयभीत झाले. यावेळी भानुदास लांडे यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्याचबरोबर शहर पोलिसांनाही घटनेबाबत कळविले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी दोन्ही वृध्द दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळीच दोघांचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती जाणून घेतली. सदर वृध्द दाम्पत्याने आत्महत्या केली अथवा त्यांचा घातपात झाला? याबाबत पोलिस विभागाकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा भानुदास लांडे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com