शांभवी सोनवणेचे राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश

शांभवी सोनवणेचे राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमधील सिम्बॉयसिस शाळेची विद्यार्थिनी शांभवी सोनावणे हिने गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन केले. शांभवी या स्पर्धेत उपविजेती राहिली.

तिच्या कामगिरीमुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नाशिकमधील सावरकर नगर येथील अेस अकादमीमध्ये शांभवी गेल्या साडेतीन वर्षांपासून सराव करते.

या स्पर्धा १६ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान बडोदा येथे खेळविण्यात आल्या होत्या. आजवर खेळाडू उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत होते मात्र, शांभवीने थेट अंतिम सामन्यात प्रवेश करून प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगली टक्कर दिली.

शांभवीने अशी कामगिरी पहिल्यांदाच केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती प्रशिक्षक आदित्य राव यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

नाशिकने वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रीडाप्रकारात आजवर अनेक खेळाडू दिले आहेत. सर्वच खेळाडू आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावताना नजरेस पडतात. नाशिकमधील वातावरण खेळाडूंच्या सरावासाठी पोषक असून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून खेळाडू बाहेर येत असल्याचेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com