पडक्या इमारतीत जीवघेणे शिक्षण; वडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोजतेय अखेरच्या घटका

jalgaon-digital
2 Min Read

वाजगाव | शुभानंद देवरे

वडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जुन्या इमारतीत जीव मुठीत घेवून शिक्षण घ्यावे लागत आहे. याठिकाणच्या शाळेची दुरवस्था झाली असून उद्या काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. देवळा तालुका व जिल्हा प्रशासनाचा तीव्र रोष व्यक्त करत माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र केदारे यांनी गटविकास अधिकारी देवळा यांना देण्यात आलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.

यामध्ये देवळा तालुक्यातील वाजगाव /वडाळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ४ पर्यंत ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना केवळ दोनच वर्ग खोल्या मध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

यातही शाळेची इमारत दगडाची असून सन १९६३/६४ मध्ये बांधकाम केलेली आहे. सदरची इमारत मोठ्याप्रमाणात मोडकळीस आली असून अतिशय धोकादायक झाली आहे.

इमारतीच्या पायाचे व भिंत्तीचे दगड निखळले आहेत. विद्यार्थी या शाळेच्या आजूबाजूला खेळण्यासाठीदेखील बाहेर पडतात. यावेळी एखाद्या विद्यार्थ्याने हात लावण्याचा प्रयत्न केला तरी दगड निखळून पडतात अशी परिस्थिती आहे.

याबाबत येथील शिक्षकांनी सदरची इमारत निर्लेखित करण्याचा प्रस्ताव सन २०१३ मध्ये वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता.  सदर इमारत निर्लेखन प्रस्ताव तत्काळ मंजूर करून इमारत पडण्याची परवानगी मिळावी अशीही मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना पर्यायी वर्गखोल्या उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याठिकाणी बसण्याची व्यवस्था करून येणारे संकट टाळावे असेही म्हटले आहे.

वडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत निर्लेखन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्याद्यापक अनिल भामरे यांनी सन २०१३ मध्ये वरिष्ठ कार्यालयास सादर करून आज आठ वर्ष झाली, पण अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नाही. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून शिक्षण घ्यावे लागते आहे.

राजेंद्र केदारे माजी उपसरपंच वाजगाव /वडाळे 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *