सटाणा शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसर सील; ११ हाय रिस्क कॉन्टॅक्ट ‘क्वारंटाईन’
स्थानिक बातम्या

सटाणा शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसर सील; ११ हाय रिस्क कॉन्टॅक्ट ‘क्वारंटाईन’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सटाणा | प्रतिनिधी 

सटाणा शहरासह तालुक्यात एकुण चार करोना रुग्णांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे बागलाण वरील करोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. शहरात दोन रुग्ण बागलाण तालुक्यात आढळून आले होते. यात फुलेनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा तर ताहाराबाद येथील एका रुग्णाचा समावेश होता.

यातून बागलाणकर सावरत नाही तोच आज आलेल्या अहवालात सटाणा शहरातील दाम्पत्य आणि वरचे टेंभे येथील दोन रुग्ण बाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.

आजचे बाधित रुग्ण करोनाची लक्षणे आढळून आल्याने अजमिर सौंदाणे येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. यामुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी पूर्ववत आलेल्या सटाणा शहरावर पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यामुळे ३०० मीटर परिसर सील करण्यात आला आहे.

शहरातील एका तरुण दाम्पत्याला करोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे संबंधितांना तालुक्यातील अजमीर सौंदाणे केंद्रांत क्वारंटाइन करण्यात आले होते. नंतरच्या काळात विलंबाने प्राप्त झालेल्या करोना रिपोर्टनुसार हे दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

या दाम्पत्याच्या सहवासातील इतर ११ व्यक्तींना अजमीर सौंदाणे क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील वरचे टेंभे गावातील करोना बाधित मृत महिलेच्या संपर्कात आलेली पन्नास वर्षीय महिला व दहा वर्षांच्या मुलाचा अहवाल बाधित आढळून आला आहे.

यापूर्वी मृत झालेली महिला  वासोळपाडा ( ता. देवळा ) येथे माहेरी गेली असता, त्यावेळी संपर्कात आलेल्या अकरा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. करोना बाधित मृत महिलेच्या अंत्यविधीस जाण्यासाठी एकाच वाहनातून १४ व्यक्तींनी प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे.

संबंधितांना देखील सद्यस्थितीत क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. करोना सारख्या गंभीर संकटाशी सामना करताना सामान्य जनतेसह समाजातील जबाबदार घटकांतर्फे अक्षम्य बेफिकिरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या  तालुक्याबाहेरील ठिकाणी जाणाऱ्या व्यक्ती, तसेच बाहेरगावाहून तालुक्यात येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com