नाशकात धाडसी चोरी; शोरूम फोडून ८० आयफोन लांबवले
स्थानिक बातम्या

नाशकात धाडसी चोरी; शोरूम फोडून ८० आयफोन लांबवले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एलिमेंट्स मोबाईल शोरूम मध्य धाडसी चोरी झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी आयफोनसह इतर महागड्या ८० मोबाईलवरती डल्ला मारत नाशिक पोलिसांना एक प्रकारे खुले आव्हानच दिले आहे. धाडसी चोरीत जवळजवळ ८० ते ९० लाख रुपये किमतीचे मोबाईल असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवले आहेत.

गंगापूररोडवर एलिमेंट नावाचे भव्य अ‍ॅपल कंपनीचे अधिकृत विक्री दालन आहे. या दालनाशेजारी एक ज्वेलर्स शोरूम असून या शोरूमभोवती सशस्त्र सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात.

तसेच या भागामध्ये २४ तास सीसीटीव्हीची नजर असते,. एलिमेेंट शोरूमला लागूनच एक रूग्णालयदेखील आहे. यामुळे रात्रीदेखील याठिकाणी वर्दळ  दिसून येते.

अशी परिस्थिती असतानाही चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडस करत काही मीटर उंच असलेले एलिमेंट दालनाचे अत्याधुनिक शटर वरती करत दालनात प्रवेश केला.

दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अ‍ॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागडे मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध लावला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे चित्र वाढलेलेच दिसून येत आहे. जबरी लुटीच्या घटना, हत्या, पोलिसांची लाचखोरी, नेहमीच कानावर पडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना यामुळे नाशिक शहर प्रकाशझोतात आले आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यावी अशी मागणी भीतीच्या सावटाखाली असलेल्या नाशिककरांकडून केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com