नाशिकच्या रस्त्यांवर लाल पेरूंना अधिक मागणी; जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे
स्थानिक बातम्या

नाशिकच्या रस्त्यांवर लाल पेरूंना अधिक मागणी; जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात फेरफटका मारताना, सोमेश्वरला जाताना, जुने नाशिक किंवा शहरातील मुख्य चौकांमध्ये पेरूची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येते. अलीकडे शेतकरी स्वतःच शेतातील पेरू शहराच्या विविध भागात विक्री करताना दिसतात. शेतकऱ्यांच्याकडील ताज्या पेरूंना अधिक मागणी आहे.

नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात पेरूच्या बागा शेतकऱ्यांनी थाटल्या आहेत.  सोमेश्वर परिसर, गंगापूर रोड, निफाड, दिंडोरी व सिन्नर तालुक्यात पेरू चे वेगवेगळे वाण शेतकऱ्यांनी लावले असून अनेक नवनवे प्रयोग शेतकरी करू लागले आहेत.

पेरू खरेदी करताना मालाचा तोलमोल (बार्गेनिंग) करून ग्राहक माघारी जाणार नाहीत याचीही काळजी शेतकरी घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून पेरू खरेदीला नाशिककरांची मोठी पसंती दिसून येत आहे. पेरू विक्रीतून मोठी आर्थिक उलाढालदेखील होत असल्यामुळे शेतकऱ्यांसह किरकोळ व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

भारतासोबतच चीन ब्राझील, कोलंबिया, मेक्सिको यांसारख्या देशात पेरूचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. हे फळ ताजे खाण्यात जास्त मजा येते असा अनेकांचा अनुभव आहे. पेरूचा उपयोग ज्यूस, जाम,  बनवण्यासाठी तसेच अन्य पदार्थांमध्ये देखील करतात. नाशिकच्या विविध भागात आता हायब्रीड वाण आणून पेरूचे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लखनऊ जातीच्या पेरूंची अधिक लागवड येणाऱ्या काळात जिल्ह्यात होण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

पेरू खाण्याचे फायदे

पेरूच्या पानांचे फुलांचे गुणधर्म हेदेखील औषधी आहेत. उच्चरक्तदाब, कॅन्सर, मधुमेह व खोकला यांसारखे आजारांवर मात करण्यासाठी पेरूचे सेवन करण्यास वैद्यकीय अधिकारी आवर्जून सांगतात. पोटाच्या विकारांसाठी पेरू हे खूप गुणकारी औषध म्हणून बघितले जाते. पेरू मध्ये विटामिन सी, फायबर तसेच इतर पौष्टिक पदार्थांचा स्त्रोत असतो तो सर्व मिळून एका एंटीऑक्सीडेंट सारखा शरीरात काम करतो.

हे एंटीऑक्सीडेंट शरीरात होणाऱ्या हानीकारक प्रभावांची गती धीमी करण्यास मदत करते. पेरूच्या सालीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट सोबतच इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो जे शरीरास फायदेशीर असते.

बारा आठवड्यात आपण जेवढे चरबीयुक्त पदार्थ आपण सेवन करतो त्या जागी पेरूचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते.

पोटदुखी, मोतीबिंदू, मधुमेह, खोकला, हृदय विकार, वजन संबंधीच्या समस्या यांसारख्या आजारांवर देखील पेरू फायदेशीर असतो. पेरू मध्ये असलेले पोस्टीक सत्व हे शरीरास तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.

डोळे निरोगी राहण्यासाठी पेरूमध्ये असलेला विटामिन ए हा गुणधर्म मदत करतो. नुसते पेरूचे फळत नाही तर पेरूची पाने सुद्धा गुणकारी आहेत.

पेरूची पाने चावून खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात. पेरू मध्ये असलेले विटामिन सी, डी आणि पोटॅशियम हे त्वचेला तजेल करण्यासाठी मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा पेरू खाणे जरुरी आहे. एवढेच नाही तर ऍसिडिटी, दमा, दात आणि हिरड्या यांमधील दुखणे यांवर देखील पेरूचे सेवन गुणकारी असते.

Deshdoot
www.deshdoot.com