झेडपी : अध्यक्षपदी राजश्री घुले, उपाध्यक्ष शेळके
स्थानिक बातम्या

झेडपी : अध्यक्षपदी राजश्री घुले, उपाध्यक्ष शेळके

Sarvmat Digital

महाविकासआघाडीची सत्ता : ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांची माघार

अहमदनगर (प्रतिनिधी)–  जिल्हा परिषदेच्या 23 व्या अध्यक्षाच्या रुपाने विद्यमान उपाध्यक्षा आणि महाआघाडीच्या उमेदवार राजश्रीताई घुले आणि उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपच्या सुनीता खेडकर आणि उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

पुढील अडीच वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती. महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील निवडणूक निर्णय अधिकारी होत्या. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सकाळी 11 ते 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ होती.

यावेळेत महाविकास आघाडीकडून घुले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या एका अर्जावर कैलास वाकचौरे, तर दुसर्‍या अर्जावर माधव लामखडे यांच्या सूचक म्हणून सह्या होत्या. तर उपाध्यक्षपदासाठी प्रताप शेळके यांनी देखील दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या एका अर्जावर अनिता हराळ आणि दुसर्‍या अर्जावर रामहरी कातोरे यांच्या सह्या होत्या.

भाजपकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता खेडकर यांच्या अर्जावर जालिंदर वाकचौेरे आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या आठरे यांच्या अर्जावर सोमीनाथ पाचरणे यांच्या सह्या होत्या. दुपारी तीन वाजता दाखल अर्जांची छाननी झाल्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. यावेळी खेडकर

आणि आठरे यांनी उमदेवारी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी घुले आणि उपाध्यक्षपदी शेळके बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष कार्यालयात माजी अध्यक्षा शालीनीताई विखे यांच्या उपस्थितीत अध्यक्षा घुले यांना अध्यक्षपदाची सूत्र सोपवून सन्मानाने अध्यक्षाच्या खुर्चीत बसविले.

दरम्यान, तत्पूर्वी विखे गटाच्या सदस्यांची विळद घाट, भाजपच्या सदस्यांची राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या सदस्य व नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. पक्षाच्या स्वतंत्र बैठकानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर भाजपच्या सदस्य आणि नेत्यांची चर्चा होवून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

अर्धातास आधी सदस्य सभागृहात
साधारण अडीच वाजता महाविकास आघाडीचे सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात दाखल झाले. त्यानंतर दहा मिनीटांनी माजी अध्यक्षा शालीनीताई विखे यांच्यासह त्यांच्या गटाचे दहा सदस्य आणि 2 वाजून 50 मिनिटांनी भाजपचे 12 सदस्य सभागृहात दाखल झाले.

चार सदस्यांची दांडी
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलविलेल्या विशेष सभेला 72 पैकी 68 सदस्य हजर होते. अनुपस्थित सदस्यांमध्ये राहुल राजळे, ललिता शिरसाठ, ताराबाई पंधरकर आणि भाग्यश्री मोकाटे यांचा समावेश आहे. सदस्या सुनीता भांगरे या उशीरा सभागृहात आल्या.

अन् संख्याबळाचा विषय संपला
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मतदानाची संख्याबळाची महाविकास आघाडीने केली होती. बहुमतासाठी 37 सदस्यांची आवश्यकता होती. महाविकास आघाडीच्या सदस्यांचा आकडा 46 पर्यंत पोहचला होता. यात राष्ट्रवादी 19, काँग्रेस 13 (थोरात गट), शिवसेना 6, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, अपक्ष हर्षदा काकडे, कम्युनिष्ठ उज्ज्वला ठुबे, महाआघाडीचे शरद नवले आणि संगिता गांगर्डे यांचा समावेश होता.

चांगले काम करण्याची संधी मिळाली : विखे
जिल्हा परिषदेत गेली अडीच वर्षापेक्षा अधिक काळ चांगले काम करण्याची संधी मिळाली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना सहकार्य राहील. मात्र, काँग्रेसच्या प्रतोदाची निवड करतांना विश्वासात घेणे आवश्यक होते. तसे झाले नाही. नवीन वर्ष सुरू होत असून नव्या जोमाने कामाला सुरूवात करणार असल्याचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सांगितले.

पहिल्याच सभेत विखे आक्रमक
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या पहिल्याच सभेत माजी अध्यक्षा विखे आक्रमक दिसल्या. यावेळी त्यांनी नतून अध्यक्षा घुले यांना चिमटेही काढले. काही महिला सदस्यांना हस्तांदोलन तर काहींना नमस्कार, घुलेताई आता दोन्ही कान झाकले का? कैलास वाकचौरे तर आता मागे वळून पण बघत नाहीत, अशा शब्दात त्यांनी सभागृहात फटकेबाजी केली.

विरोध काय ते दाखवू : वाकचौरे
जिल्हा परिषदेच्या सत्तेवर प्रभावी विरोधक म्हणून अंकूश ठेवणार असून पुढील दोन वर्षात विरोधक काय असतात ते दाखवून देवू. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केल्यामुळे आणि भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तसेच जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेवून काम करण्यासोबत समान निधी देण्याचे आश्वासन महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिलेले आहे. यामुळे दोन पावले मागे घेतल्याचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.

माजी अध्यक्षा विखे संतापल्या

शालिनीताई विखे सभागृहात येऊन बसताच काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी त्यांना पक्षादेश बजावला. या आदेशात अध्यक्षपदासाठी घुले आणि उपाध्यक्षपदासाठी शेळके यांची नावे होती. यावेळी माजी अध्यक्षा विखे गटनेते फटांगरे यांच्यावर संतप्त झाल्या. सभागृहाच्या दरवाजात व्हिप बजावतात का? काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद तुमच्यामुळे गेले. गटनेता बदलताना विश्वासात का घेतले नाही? काँग्रेसमधील विखे गटाच्या सदस्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा प्रकारे आमचा विश्वासघात करायचा नव्हता, या शब्दांत फटांगरे यांना फटकारले. यावेळी सदस्य राजेश परजणे देखील संतापले होते. गटनेता बदलताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही. तुमच्यावर पक्षाचा विश्वास नव्हता, यामुळे तुम्हाला सहलीला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सुनावले.

सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार : घुले
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नूतन अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात समाजातील सर्व तळागाळातील लोकांसाठी आणि पक्षविरहीत राजकारण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वांना न्याय देणार : शेळके
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवित जिल्हा परिषदेत समान पद्धतीने काम करण्यात येईल. सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास नूतन उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी व्यक्त केला.

शेळकेंच्या रुपाने दक्षिणेला न्याय
जिल्हा परिषदेत थोरात गटाने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला प्रताप शेळके यांच्या उपाध्यक्षपदाच्या रुपाने न्याय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून नगर तालुक्यातील शेळके कुटुंबाला पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली गेली नव्हती. आता जिल्हा परिषद उपाध्यक्षपदामुळे ना.थोरातांनी दक्षिणेत काँग्रेस पक्ष बळकटीसाठी पावले टाकली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com