Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याद्राक्ष पंढरीत बागायतदारांवर द्राक्षे वाळत घालण्याची वेळ…

द्राक्ष पंढरीत बागायतदारांवर द्राक्षे वाळत घालण्याची वेळ…

नाशिक । प्रतिनिधी 

युरोप, अमेरिकेपची बाजारपेठ काबीज करणाऱ्या नाशिकच्या द्राक्षांवर यंदा करोनाचे संकट पहायला मिळत आहे. लाॅकडाऊनमुळे देश बंद असून त्याचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे.

- Advertisement -

व्यापारी देखील बागातून द्राक्ष काढण्यास नकार देत आहे. त्यामुळे द्राक्षांची निर्यातक्षम आणि दर्जेदार उत्पादन शेतात वाळत घालण्याची वेळ आली आहे. दरवर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाला सामोऱ्या जाणार्या बागायितदरांवर यंदा करोनाच्या सावटामुळे द्राक्षे विक्री करता येत नाहीयेत.   या फटक्यामुळे फटक्यामुळे द्राक्ष पंढरीतील बागायतदार चिंतातूर आहेत.

नाशिकचे द्राक्ष गोडव्यामुळे जगाची बाजारपेठ काबिज करतात. मार्च व एप्रिल महिन्यात युरोप, अमेरिका, आस्ट्रेलिया येथील देशांमध्ये कंटेनरच्या कंटेनर द्राक्ष निर्यात केली जातात. त्यातून कोट्यवधीचे परकीय चलन देशाच्या गंगाजळीत जमा होते. पण यंदा करोना संकटाने द्राक्ष बागेतच पडून राहिले आहेत.

करोना विषाणूचा फटका सर्वच स्तरावर जाणवू लागला आहे. देशभरात 15 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, उद्योग बंद आहे. त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.

सध्या द्राक्षाचा हंगाम असल्याने तयार झालेला माल काढण्यास व्यापार्‍यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हे द्राक्ष जमिनीवर टाकल्याशिवाय पर्याय उरला नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सीमा बंदी देखील लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काढलेला माल दुसऱ्या राज्यात किंबहुना जिल्ह्यात पोहोचवयाचा कसा असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

अस्मानी संकट आणि सरकारी संचारबंदीमुळे सामान्य शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळायची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी द्राक्ष बाग तोडायला नकार दिल्याने शेतकऱ्यांनी अखेर तयार झालेल्या द्राक्षांचा बेदाणा करायचा निर्णय घेतला आहे.

ट्रान्सपोर्टला असलेली बंदी शासनाने उठवावी आणि शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर काढावी. अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादक करत आहेत. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन बाग लावले आहेत. करोना संकटाची परिस्थिती अशीच राहिल्यास बागायतदारांसाठी द्राक्ष यंदा आंबट ठरणार आहे.

लाॅकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी देखील बाग काढायला नापसंती दाखवली आहे. बाग काढला तरी राज्याच्या सीमेवर दोन दोन दिवस माल ट्रक उभे असतात. त्यामुळे माल सडून खराब झाल्यास आर्थिक नुकसानीची भीती व्यापार्‍यांना सतावत आहे.

-दयाराम पाटील, द्राक्ष उत्पादक

- Advertisment -

ताज्या बातम्या