सारथी बचावसाठी विद्यार्थ्यांसह छत्रपती संभाजीराजेंनी सुरु केलेले उपोषण मागे
स्थानिक बातम्या

सारथी बचावसाठी विद्यार्थ्यांसह छत्रपती संभाजीराजेंनी सुरु केलेले उपोषण मागे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पुणे | प्रतिनिधी

छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित राखली जावी, ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवावे, त्यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द करण्यात यावे तसेच सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांसह छत्रपती संभाजीराजेंनी सुरू केलेले उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले.

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, अशी ग्वाही दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

सारथी संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थेवर सातत्याने अन्याय होत आहे. हजारो मुलांचे भवितव्य यामुळे अंधारात आहे. शासन दरबारी या प्रश्नाची दखल घेतली जात नाही. यापार्श्वभूमीवर सारथीचा तारादूत प्रकल्प बचाव यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजेयांसह मराठा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शनिवारी गोपाळ गणेश आगरकर रस्त्यावरील बालचित्रवाणीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी, कृषितज्ञ बुधाजीराव मुळीक, अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी केंद्रिय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार विजय गव्हाणे, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी ही संस्था राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरू झाली आहे. त्याची स्वायतत्ता अबाधित ठेवण्याची गरज आहे. गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी निर्माण झालेल्या संस्थेची स्वायतत्ता अबाधित राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

मात्र, संस्था मोडीत काढण्याचे कारस्थान सचिव जे. पी. गुप्ता करीत आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका हा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यानाही अंधारात ठेवले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु असतानाही त्यांनी संस्थेसह विद्यार्थ्यांसाठी बाधक निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे सारथी संस्थेचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांना पदावरुन हलविणे गरजेचे आहे. जर त्यांना पदावरून काढले नाही, तर मुंबईत दौरा काढणार असल्याचा इशारा महाराजांनी दिला. मराठा समाज लोकशाही पद्धतीने चालला आहे. विविध मागण्यांसाठी शांतताप्रिय मार्गाने 58 मोर्चे काढून समाजापुढे आम्ही आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, सारथीची स्वायत्तता अबाधित राहील, यासाठी शासन कटिबद्ध असून आक्षेपांबाबतची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येईल. याखेरीज, ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी अद्यापपर्यंत जारी केलेले सर्व निर्णय रद्द करण्यात येतील. तसेच, त्यांना पदावरून हटविण्यात येईल. संस्थेचे महासंचालक श्री. परिहार यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार नाही . सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील गुन्हे मागे घेणे याबाबतही समिती नेमून निर्णय घेण्यात येईल.

तर, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
उपोषणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेत सारथी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतं देणार नायं – घेतल्याशिवाय जाणार नाय, जे पी गुप्ताचं करायच काय- खाली डोकं वर पाय, गुप्ता हटवा – सारथी वाचवा अशा घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध केला.

उरलेल्या मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

मराठा आंदोलनादरम्यान काही मराठा बांधवांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी समितीची स्थापना केली जाणार असून उरलेल्या मराठा बांधवांवरील केसेस मागे घेणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com