आडगाव ट्रक टर्मिनलमधील अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्या –  भुजबळ
स्थानिक बातम्या

आडगाव ट्रक टर्मिनलमधील अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्या –  भुजबळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

आडगाव ट्रक टर्मिनल मध्ये अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून  देण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने ना.छगन भुजबळ यांची भेट घेऊन ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांच्या विविध प्रश्नाबाबत निवेदन दिले. यावेळी ना.भुजबळ यांनी तातडीने आडगाव ट्रक टर्मिनलमधील आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा, अमोल शेळके, महेंद्रसिंग राजपूत , विनोद शर्मा, सुनील जांगडा, प्रशांत वशिष्ट, राजेश शर्मा, गुरमेल सिंग, सुलेमान शेख,शरद बोरसे,दीपक ढिकले यांच्यासह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने ना.छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरालगत आडगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आडगाव येथे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी थांब्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मात्र या ठिकाणी असलेल्या ट्रक ट्रामिनलची प्रचंड दुरावस्ता झाली असून ट्रक चालक तसेच व्यवसायिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी जवळपास ४७ व्यापारी गाळे निर्माण केले आहे. सद्य स्थितीत केवळ १० ते १२ व्यापारी गाळे सुरू आहे. याठिकाणी असलेली अस्वच्छता, ड्रेनेज लाईनचा प्रश्न, मोबाईल नेटवर्कचा प्रश्न यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याठिकाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्याने याठिकाणी प्रचंड दुर्गंधी सव्रक्षान भिंत , डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने ट्रक चालकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुविधे अभावी या टर्मिनलचा विकास रखडला गेला आहे. याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर येथील गाळे देखील सुरू होऊन महापालिकेला उत्पन्न सुरू होईल. तसेच वाहतुकदारांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील असे म्हटले आहे.

त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या थांब्यासाठी अंबड नजीक विल्होळी येथे ट्रक टर्मिनलची जागा होती. मात्र याठिकाणी महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आल्याने याठिकाणी येथे वाहने उभी राहू शकत नाही. त्यामुळे ही अवजड वाहने अंबड येथील वसाहतीत रस्त्याच्या बाजूला उभी करावी लागतात त्यामुळे याठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच अपघातही होतात.

त्यामुळे वाहतूक व्यावसायिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी ट्रक टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व सिन्नर शहर आणि नाशिक पुणे हायवेला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

याबाबत ना.छगन भुजबळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आडगाव येथे आवश्यक त्या सोयी सुविधा तातडीने करून देण्याच्या आदेश नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिल्या आहे.

Deshdoot
www.deshdoot.com