घरबसल्या समजणार मालमत्तेचे मूल्य व मुद्रांक शुल्क; उद्यापासून नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर माहिती मिळणार

घरबसल्या समजणार मालमत्तेचे मूल्य व मुद्रांक शुल्क; उद्यापासून नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर माहिती मिळणार

नाशिक । प्रतिनिधी 

जमीन, सदनिका आणि दुकाने आदी मालमत्तांचे  चालू बाजारमूल्य तसेच त्या मालमत्तेवर भरावे लागणारे मुद्रांक शुल्क (स्टॅम्पड्युटी) याची माहिती आता घरबसल्या समजणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यासाठी ई – व्हॅल्युएशन  सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यामुळे एखाद्या मालमत्तेचे बाजारमूल्य अथवा मुद्रांक शुल्क याची माहिती घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता असणार नाही. या सुविधेमुळे मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार असून उद्या दि.1 जानेवारीपासून ही सुविधा नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी वार्षिक मूल्यदर तक्‍ते (रेडी रेकनर) व सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना नोंदणी विभागामार्फत दरवर्षी दिल्या जातात.

मूल्यांकनासाठीच्या सूचना या तांत्रिक स्वरूपाच्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्यासाठी  दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. तेथेच मुद्रांक शुल्क आकारणीची रक्‍कम निश्‍चित करून घ्यावी लागते. या पार्श्‍वभूमीवर अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे.

त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर ई-व्हॅल्युएशन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रणालीचा वापर मुंबईमध्ये अधिकाधिक नागरिकांनी केला व  त्यास चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या सुविधेमुळे कमी मुद्रांक शुल्क भरल्या प्रकरणीचे दावेदेखील कमी झाल्याचे दिसून आले. प्रणाली यशस्वी झाल्याने आता संपूर्ण राज्यात ई-व्हॅल्युएशन ही प्रणाली राबवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे.

ई-व्हॅल्युएशन ही मूल्यांकन प्रणाली नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, सहसंचालक नगर रचना मूल्यांकन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) यांनी विकसित केली आहे. नववर्षामध्ये नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सुविधा उपलब्ध करून देण्याचा नोंदणी विभागाचा मानस आहे.

– अनिल कवडे, राज्य नोंदणी महानिरीक्षक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com