पुनद सुळे कालव्यातील प्रकल्पग्रस्त अद्यापही मोबदल्यापासून वंचित; उपोषणाचा इशारा
स्थानिक बातम्या

पुनद सुळे कालव्यातील प्रकल्पग्रस्त अद्यापही मोबदल्यापासून वंचित; उपोषणाचा इशारा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

खामखेडा | वार्ताहर

पुनद सुळे डावा कालव्यात जमिनी गेलेले खामखेडा ता.देवळा येथील शेतकरी अजूनही मोबदल्यापासून वंचित असुन शासनाने लवकरात- लवकर आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी कालव्यात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

पुनद सुळे डावा कालव्याच्या ३६ की.मी ते ३९ की.मी यादरम्यान खामखेडा ता.देवळा शिवारातील तीन किलोमीटर वर पुनद सुळे डावा कालव्याकरिता गत १०-११ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा आर्थिक मोबदला अद्यापही येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

पुनद सुळे डावा कालव्यासाठी गत १०-११ वर्षांपूर्वी खामखेडा शिवारातील २७ ते २८ गटांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाने संपादित करून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या उभ्या पिकात बुलडोझर चालवित होत्याचं नव्हतं केलं अन कालव्याचे काम पूर्ण केले होते परंतु पाच ते सहा वर्षे उलटूनही अद्यापही त्याबदल्यात त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदलाही मिळालेला नसून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

खामखेडा शिवारातील २७-२८ शेतगटांच्या जमिनीतून कालवा काढण्यात आला होता.या कालव्यापासून फक्त पावसाळ्यातच पूर पाण्याद्वारे उर्वरित शेतीला सिंचनही होत आहे असे असले तरी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्याने शेतकरी संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत तर सदर आर्थिक मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहेत.

पाच ते सहा वर्षे उलटूनही प्रशासनाने संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही त्वरित संपूर्ण प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू.

श्रावण बोरसे,प्रकल्पग्रस्त शेतकरी खामखेडा

Deshdoot
www.deshdoot.com