‘अपना भिडू…बच्चू कडू’ मंत्री झाले मंत्री…
स्थानिक बातम्या

‘अपना भिडू…बच्चू कडू’ मंत्री झाले मंत्री…

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

विधीमंडळाच्या प्रांगणात आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. नेहमी मंत्र्यांना वठणीवर आणणारे आणि शेतकरी दिव्यांगांसाठी आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनीही आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

प्रहारचे कार्यकर्ते कडूंना ‘अपना भिडू बच्चू कडू’ असे म्हणतात. सरकार कुणाचेही असो चांगले काम केले तर कौतुक आणि अन्यायकारक निर्णय किंवा काम झाले तर तेव्हा भर विधानसभेत खडसावणारे बच्चू कडू आता मंत्री झाले आहेत.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर  ठिकठिकाणी प्रहर जनशक्तीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. अद्याप बच्चू कडू यांना कुठले खाते मिळणार याबाबत समजले नसले तरीही बच्चू भाऊ आता मंत्री झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.

बच्चू कडू पहिल्यांदाच मंत्री म्हणून महाविकास आघाडीतर्फे मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. यावेळी त्यांच्या कारभाराची पद्धत, शेतकऱ्यांसाठी त्यांच्याप्रती असलेला आदर. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व ते आपल्या कामातून कशाप्रकारे व्यक्त करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सोशल मीडियात बच्चू कडू यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वत्र अभिनंदन केले जात असून आपला माणूस मंत्री झाला. आता राजकारण नाही तर समाजकारण राहील. बच्चू भाऊंचे अभिनंदन. आपल्या हातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळो अशा आशयाचे अनेक संदेश सोशल मीडियात सध्या पोस्ट केले जात आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com