नाशिक पोलीस आता पीपीई किट्स परिधान करून घेणार कोरोना रूग्णांचा शोध
स्थानिक बातम्या

नाशिक पोलीस आता पीपीई किट्स परिधान करून घेणार कोरोना रूग्णांचा शोध

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

एलपीएस सर्व्हिसेसचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचे रूग्ण वाढत चालेले आहेत. बहूतांश वेळा करोना बाधिताच्या सानिध्यातील संशयित शोधण्याचे काम पोलीसांच्या विशेष कोरोंटाईन पथकाला करावे लागते. केवळ मास्क व इतर साधनांच्या आधारे सुरू या धोकादायक कामासाठी या पथकाला सातपूर येथील एलपीएस सर्विसेस या कंपनीमार्फत स्पेशल प्रोटेक्शन (पीपी) किट उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे हे काम आता अधिक सुरक्षित रित्या केले जाणार आहे.

हे पीपीई किटस एलपीएस सर्विसेस या कंपनीचे संचालक अ‍ॅड. निलेश व संदिप वाघ यांनी आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील पथकाला सुपुर्त केले आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, सहायक निरिक्षक श्रीराम पवार यांच्या हस्ते 31 पीपी किटस पथकातील कर्मचार्‍यांना वाटप करण्यात आले आहेत.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात लॉकडॉन सुरू आहे. या सर्व कालावधीत पोलीस अंमलबजावणीसाठी रस्त्यांवर कार्यरत आहेत. तर अनेक नागरीक परदेशातून तसेच इतर राज्य व जिल्ह्यातून आल्यानंतर प्रशासनास काहीही माहिती न देता गुपचूप घरी राहत आहेत अशांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना शोधण्याचे काम पोलीसांना करावे लागते.

तसेच करोनाग्रस्त रूग्ण आढळल्यास त्याच्या सानीध्यातील संशयितांचा शोध आरोग्य विभागाबरोबर घेण्याचे काम पोलीसांच्या करोंटाईन पथकालाच करावे लागते. तर आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार्‍या अशा सेविकां सोबत पोलीसांना जावे लागते आहे. प्रत्यक्ष करोनाग्रस्तांच्या सानिध्यात जावे लागत असल्याने पोलीस कर्मचार्‍यांनाही अधिकचा धोका पत्करावा लागत आहे.

आतापर्यंत मास्क, हॅण्डग्लोज तसेच इतर साधनांचा वापर करून हे काम केले जात होते. परंतु आता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सुचनेनुसार करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सातपूर येथील एलपीएस सर्विसेस या कंपनीने प्रतिसाद देत पीपी किट उपलब्ध केले आहेत. यामुळे पोलीसांची सुरक्षितता वाढण्यास मदत झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com