Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये विजेची बत्ती गुल; महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु

नाशिकमध्ये विजेची बत्ती गुल; महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु

file photo

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यामुळे नाशिक शहरासह परिसरात विजेची बत्ती गुल झाली आहे. तीन तासांचा अवधी उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. महावितरणकडून युद्धपातळीवर वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करण्याचे कामे सुरु असल्याचे कळविण्यात आले आहे.

जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला नाशिकसह पुणे, कल्याण, रत्नागिरी व राज्यातील अनेक भागात मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे.
निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज सध्याच घेता येणार नाही.

निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे सुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे.

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे.

याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार कार्यरत आहेत.

नाशिक जिल्ह्यात व शहरात ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. तसेच अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे चक्री वादळ राज्यात दोन दिवस घोंघवत असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज असल्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी सांगितलेआहे. या वादळाच्या अनुषंगाने एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.

नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, घाबरू नये व प्रशासन आणि वीज कंपन्या आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

नाशिक परिमंडळात मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्यासह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते,अभियंते जनमित्र कार्यरत असून नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या