पोलीस नाशिककरांशी खेळणार ‘क्रिकेट मॅच’; एकता टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
स्थानिक बातम्या

पोलीस नाशिककरांशी खेळणार ‘क्रिकेट मॅच’; एकता टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस आणि नागरिकांमधील संवादाचा सेतू अधिकाधिक भक्कम व्हावा या हेतूने शहर पोलीस आणि नाशिककरांमध्ये आजपासून दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच हा उपक्रम होतो आहे. गोविंदनगर येथील रणभूमी टर्फ येथे मंगळवार व बुधवारी (दि.17 व 18) दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत एकता टर्फ क्रिकेट स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची संकल्पना अभय नेरकर यांनी मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

या स्पर्धेत नाशिक शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे व शाखा यांचे एकूण 16 संघ सहभागी होत आहे. या संघामध्ये पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील. तसेच जनतेमधून पोलीस ठाणेनिहाय डॉक्टर्स, पत्रकार, नगरसेवक, खासदार-आमदार, प्रतिष्ठित व्यावसायिकांचे 16 संघ खेळणार आहेत. एकूण 32 संघ खेळणार आहेत. दुपारी 3 ते रात्री 10 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः सहभागी होणार आहेत, तसेच स्वतः पोलीस आयुक्त देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तसेच या कार्यक्रमा करिता पोलिस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले आणि विजय खरात आणि सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com