Friday, April 26, 2024
Homeनगरजोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी नाही, तोपर्यंत मौन धारण करणार- अण्णा हजारे

जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी नाही, तोपर्यंत मौन धारण करणार- अण्णा हजारे

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. अण्णा हजारे आता पुन्हा एकदा मौन धारण करणार आहेत. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी होत आहे.

या दोषींना जोपर्यंत फाशी देत नाहीत तोपर्यंत आपण मौन धारण करणार असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी अण्णा हजारे मौन सुरू करणार आहेत.

- Advertisement -

दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणातील चारही नराधमांना 2013मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र, तरी सुद्धा या आरोपींना अद्याप फाशी झाली नाही. वास्तविक निर्भयाची आई अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र त्या आईची मागणी आणि त्या आईचे अश्रू सरकारला दिसत नाहीत. सरकार आंधळं झालं आहे.

निर्भयाच्या दोषींना फाशी व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे. मात्र त्याच्या फाशीला विलंब होत आहे. हा विलंब केवळ आणि केवळ केंद्र सरकारमुळे होत असल्याची घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
सध्या देशातील प्रत्येक राज्यात महिलांवर युवतींवर आत्याचार होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान अशा घटनांत न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात जितके न्यायाधीश पाहिजेत तितके न्यायाधीश देशात किंवा प्रत्येक राज्यात नाहीत. त्यामुळे न्याय मिळायला उशीर होत आहे असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

देशात अशा घटनांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला विलंब होतं असल्यामुळेच हैदराबादमध्ये पोलिसांनी त्या नराधमांचा इन्काउंटर केला आहे अशी प्रतिक्रिया अण्णांनी व्यक्त केली. जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी होत नाही तोपर्यंत मौन धारण करणार आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राळेगणसिद्धी येथे मौन धारण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या