परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रच नव्हे, देशातील अत्यंत महत्त्वाचं व प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार यावर गेल्या काही दिवसांपसून चर्चा सुरु होत्या.

परमबीर सिंह यांच्यासोबतच पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचेही नाव या शर्यतीत होते.  परमबीर सिंह हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सिंह हे पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सिंह यांच्या मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार याच विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के. सिंग यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com