पानिपत फेम अभिनेत्री कृती सनोन हिच्याशी गप्पा…
स्थानिक बातम्या

पानिपत फेम अभिनेत्री कृती सनोन हिच्याशी गप्पा…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

‘पानिपत’मधील अभिनेत्री कृती सनोन म्हणते…“मी ते उंची आणि आलिशान कपडे प्रथमच परिधान केल्यावर मला त्या ऐतिहासिक काळात गेल्यासारखं वाटलं!” देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या असंख्य युध्दांवर आधारित चित्रपटांची बॉलीवूडमध्ये पूर्वीपासूनच निर्मिती होत होती. ज्या शूर योध्द्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांचा गौरव करणार््या असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

18 व्या शतकात झालेल्या पनिपतावरील या तिसर््या लढाईचे चित्रण यात करण्यात आले आहे. मराठा साम्राज्यचा सरदार आणि योध्दा असलेल्या सदाशिवरावभाऊंनी आपल्या देशावर आक्रमण करून आलेला अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीशी पानिपत येथे घनघोर युध्द छेडले. या भव्य चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात पार्वतीबाईंची भूमिक नामवंत अभिनेत्री कृती सनोन हिने साकारली आहे. या चित्रपटाच्या जागतिक टीव्ही प्रीमिअरनिमित्त कृतीने या चित्रपटाचे अनुभव या गप्पांमध्ये विशद केले.

मराठी ही तुझी भाषा नसतानाही तू या चित्रपटात इतक्या सफाईने अचूक मराठी संवाद कसे काय बोलू शकलीस?

मला मराठी येत नाही, हे खरं; पण चित्रपटात जे काही थोडे मराठी संवाद होते, ते अस्सल मराठी वाटावेत, याची मी काळजी घेतली. ते संवाद मी सहजतेने बोलत आहे, असं वाटण्यची मी काळजी घेतली. पूर्वीही मी तेलुगू चित्रपटात भूमिका साकारताना तेलुगू भाषेतून संवाद म्हटले होते. त्या तुलनेत मराठी भाषा नक्कीच सोपी होती.

तसंच सेटवर माझे मराठी उच्चार अस्सल वाटावेत, याकडे लक्ष देण्यसाठी एका मराठी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मी आजच्या नव्हे, तर त्या ऐतिहासिक काळातच वावरत आहे, अशी मी कल्पना केली आणि त्यामुळे माझ्या चेहर््यावर योग्य ते भाव उमटले. तसंच त्या काळातील ते कपडे परिधान केल्यामुळेही मला मी ऐतिहासिक काळात वावरत असून मी पार्वतीबाई बनल्याची भावना निर्माण झाली. चित्रीकरण संपत आलं, तोपर्यंत मी मराठीवर प्रेम करू लागले होते.

या चित्रपटात तू पार्वतीबाईंची भूमिका रंगवीत आहेस. त्याचा अनुभव कसा होता?

आशुतोषच्या सर्वच चित्रपटांतील भूमिकांप्रमाणे या चित्रपटातील पार्वतीबाईची व्यक्तिरेखाही सशक्त, बहुपैलू आणि एका स्वतंत्र स्त्रीची आहे. पार्वतीबाई या वैद्य (डॉक्टर) असतात. ती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्याही एक शक्तिशाली महिला आहे. पानिपतच्या तिसर््या लढाईतील ती एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे.

सुरुवातीला मला जेव्हा या व्यक्तिरेखेचं वर्णन करून सांगण्यात आलं, तेव्हा ही व्यक्तिरेखा किती धाडसी आणि निडर आहे, त्याची मला तितकी कल्पना आली नव्हती.  पार्वतीबाईला तलवरबाजी येत होती आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी मैदानात लढाई करण्याचीही तिची तयारी असे. त्या काळातील अन्य महिला आपल्या नवर््यावरील प्रेमाची उघड कबुली देण्याबाबत धीट नव्हत्या. पण पर्वतीबाई निर्भिडपणे बोलत असत. एकंदरीतच ही भूमिका रंगविणं हा एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव होता.

ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी तुला या कालखंडाच्या इतिहासाची कितपत माहिती होती?

प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, शाळेत असताना मला इतिहास या विषयाची काही आवड नव्हती. त्यामुळे त्या विषयाकडे मी फारसं लक्ष देत नसे. पार्वतीबाई आणि त्यांनी या लढाईत बजावलेल्या भूमिकेची मला थोडीफार माहिती होती, पण त्याचा अचूक तपशील मला ठाऊक नव्हता.

पण या चित्रपटाद्वारे त्यांनी केलेला प्रवास, त्यांच्यापुढील अडचणी आणि त्यांच्या फौजेने बजावलेल्या कामगिरीची बरीच माहिती मिळाली. पानिपताच्या या लढाईने आपल्या देशाच्या इतिहासाला कशी कलाटणी मिळाली, याची फारशी माहिती आपल्याला नसते, पण या चित्रपटच्या कथेतून ते सांगितलं गेलं आहे.

तुझ्या या मराठमोळ्या रूपाबद्दल तुला काय सांगावसं वाटतं?

मी पंजाबी असले, तरी मला एका मराठमोळ्या स्त्रीसारखे नटण्याची आणि तसे कपडे घालण्याची खूप उत्सुकता होती. त्या काळातील अस्सल खानदानी मराठी स्त्रीसारखं दिसण्यासाठी मी नऊवारी साडी नेसले, माझ्या केसांचा खोपा घातला गेला आणि नथ आणि अन्य दागिन्यांद्वारे मला पेशवीणबाईंचं रूप देण्यत आलं.

पार्वतीबाईची खरी आणि अस्सल व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी मी बरंच संशोधन केल्यवर माझ्या टीमने मला अगदी तपशीलवार दागिने चढवायला सांगितले. माझ्या केसांच्या पिना सोन्याच्या होत्या आणि त्यावर पक्षांची चित्रं होती. कर्णफुलांवर मोराचा पिसारा होता. मी ते उंची आणि आलिशान कपडे प्रथमच परिधान केल्यावर मला त्या ऐतिहासिक काळात गेल्यासारखं वाटलं!

पूर्वीच्या काळातील गाजलेल्या झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यासारख्या अभिनेत्रींबरोबर तू एकत्र भूमिका साकारली आहेस. तो अनुभव कसा होता?

या दोन्ही अभिनेत्रींचे चित्रपट पाहतच तर मी लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे या दोघींबरोबर एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. मी झीनत मॅडमना भेटले, तेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि माझ्या भूमिकांचं कौतुक केलं.

त्यांचं हे वागणं माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांनी माझ्या मनावरचा ताण कमी केला आणि माझं मन शांत केलं. पद्मिनी मॅडम या तर अगदी सूचक आणि तितक्याच मोकळ्या स्वभावाच्या अभिनेत्री आहेत. त्या आपला प्रसंग किती सहजतेने आणि निर्दोषपणे साकारायच्या ते पाहून मी थक्क झाले. या दोन्ही अभिनेत्री खूपच मेहनत घेतात आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांना आपला प्रसंग अचूकपणे साकारण्याची तीव्र इच्छा असते. त्या खरोखरच प्रेरणास्थान असून मी त्यांच्या वयाची होईन, तेव्हाही मी त्यांच्यासारखी असेन, अशी माझी इच्छा आहे.

पार्वतीबाईची भूमिका रंगविण्यासाठी तुला घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकावी लागली. त्याची तयारी कशी केलीस?

माझ्या पूर्वीच्या एक चित्रपटासाठी मी घोडेस्वारी आधीच शिकले होते. त्यामुळे पानिपतमध्ये ती करताना मला फारसे कष्ट पडले नाहीत. पण या चित्रपटसठी मला तलवारबाजीचं खास प्रशिक्षण घ्यावं लागलं. ती काही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट नाहीये, तरीही मला तलवारबाजीसाठी पेशवीणबाईंचे सर्व कपडे, नऊवारी साडी आणि सर्व दागिने घालून तलवारबाजीचे प्रसंग साकारावे लागले. असा जड पोशाख आणि दगिने घालून तलवारयुध्द साकारणं हे एक आव्हानच होतं.

पण ते करताना मजाही खूप आली. या चित्रपटच्या चित्रीकरणादरम्यान मला जाणवलं की मला अॅक्शन प्रसंग रंगविणं आवडतं आणि भविष्यात असे प्रसंग साकारायला मला नक्कीच आवडेल.

Deshdoot
www.deshdoot.com