पॅन आणि आधार कार्ड लिंकसाठी ३१ डिसेंबरची मुदत

नाशिक । प्रतिनिधी

इन्कमटॅक्स विभागाने पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची डेडलाईन सातव्या खेपेला पुन्हा वाढवून दिली आहे. आता दि. ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन किंवा एसएमएस च्या मदतीने हे काम न केल्यास सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस यांच्याकडून तुमचे पॅनकार्ड अवैध ठरवले जाईल असा इशारा इन्कमटॅक्स विभागाकडून देण्यात आला आहे.

दि. ३१ डिसेंबर नंतर पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यास ते अवैध ठरवण्याबरोबरच त्या व्यक्तीने पॅन कार्डसाठी अर्जच केलेला नाही असे समजण्यात येईल असेही इन्कमटॅक्स विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फायनान्स बिलनुसार निर्धारित डेडलाइन संपल्यानंतर आधार कार्डला लिंक न केलेलं पॅन कार्ड वापरण्यायोग्य राहणार नाही.

त्यामुळेच हे टाळायचे असेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचे काम लवकर करावे लागणार आहे. आत्ताच्या नियमानुसार तुम्ही पॅनकार्डच्या जागी आधार कार्डचा नंबर देऊ शकता. पण त्यासाठी ही दोन्ही कार्ड लिंक करणं आवश्यक असणार आहे.

कसे कराल कार्ड लिंकिंग 

तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून लिंक करू शकता. ई फायलिंग पोर्टलवर लिंक आधार नावाची एक खिडकी आहे. इथे तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल, त्याच्या मदतीने दोन्ही कार्ड लिंक होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या पर्यायात UIDPAN< 10 अंकी पॅन नंबर टाकून 567678 किंवा 56161 या नंबरवर एसएमएस करावा लागेल. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना या दोन्ही कार्डवर  तुमचे नाव, लिंग आणि जन्मतारीख हा मजकूर सारखाच असला पाहिजे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *