Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतब्बल एक कोटींचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

तब्बल एक कोटींचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

एका मालट्रकमध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवत कोट्यावधींचा मद्यसाठयाची वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्कच्या कारवाईत पकडण्यात आला. या कारवाईत हरियाणा व अरूणाचल प्रदेशात निर्मिती केलेला  तसेच महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात विभागीय भरारी पथकाने केली. अवैध मद्यवाहतुकीमागे मोठी टोळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

सतीश शिवसिंग (रा.खानपुरा – धौलपुर,राजस्थान) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. काल (दि.५) मोठ्या प्रमाणात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती.

त्यानुसार विभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर असतांना वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात एका मालट्रकचा संशय आल्याने त्याची तपासणी केली. यावेळी मद्याने भरलेला मालट्रक या विभागाच्या हाती लागला.

विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक मनोहर अंचुळे व निरीक्षक आर.एम.फुलझळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे,एस.एस.रावते,सी.एच.पाटील, जवान दिपक आव्हाड, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके, गोकुळ शिंदे व अमन तडवी आदींच्या पथकाने गोंडेगाव फाटा येथे सापळा रचून यशस्वी कारवाई केली.

पथकाची चाहूल लागताच सुवन अवतार सिंग या चालकाने पोबारा केला तर त्याचा साथीदार सतीश शिवसिंग हा संशयीत पथकाच्या हाती लागला आहे.

या वाहनातून विविध प्रकारचे सुमारे ९४५ विदेशी दारूचे बॉक्स वाहतूक होत असल्याचे पुढे आले आहेत.  दरम्यान सुमारे १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केलेल्या संशयितास पथक मुख्यालयात घेवून येत असतांना द्वारका भागात संशयिताने धुम ठोकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, स्थानिकांच्या मदतीने त्यास पकडण्यात यश आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्यवाहतूकीत आंतरराराज्य टोळीचा समावेश असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीने पथक शोध घेत आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या